नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांना खालसा एड या स्वयंसेवी संस्थेतर्फे दैनंदिन वापराच्या वस्तू मोफत दिल्या जात आहेत. त्यासाठी आंदोलनस्थळी एक किसान मॉल सुरू करण्यात आला आहे.या आंदोलनासाठी अनेक जण आपल्या घरातून पुरेसे कपडेलत्ते किंवा दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तू न घेताच निघाले होते. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून बसल्यानंतर या आंदोलकांना अनेक गोष्टींची उणीव भासू लागली होती. हे लक्षात येताच खालसा एड इंडिया या स्वयंसेवी संस्थेने सिंघू व तिक्री सीमेवर आंदोलनस्थळी किसान मॉल सुरू केला. पायमोजे, मफलर, व्हॅसलिन, कंगवे, हिटिंग पॅड, नी-कॅप, शाली, ब्लँकेट अशा अनेक वस्तू किसान मॉलच्या रॅकवर ठेवलेल्या असतात. मात्र, या वस्तू विक्रीसाठी नव्हे तर आंदोलकांना मोफत वाटपासाठी आहेत. किसान मॉल रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेतच खुुला असतो.
शेतकरी आंदोलकांसाठी उघडला किसान मॉल, खालसा एड इंडिया संस्थेकडून मोफत वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 5:30 AM