नवी दिल्ली - देशात सीएए आणि एनआरसी विरोधी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे, काँग्रेससह कम्युनिष्ट पक्षांकडून मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. सीएए कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये आंदोलन उभारले जात आहे. तसेच, हा कायदा संविधानाची पायमल्ली करणारा असल्याचं सांगत हा विरोध मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात संमिश्र बंद पाहायला मिळाला. सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करत, मोदी सरकारचा निषेध या बंदच्या माध्यमातून नोंदविण्यात आला. सीएए आणि एनआरसीच्या वादात बॉलिवूडमधील काही सिनेतारकांनाही उडी घेतली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने जेएनयु हल्ल्यातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला होता. तर, नसरुद्द्दीन शहा यांनीही सीएएला जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. त्यानंतर, भाजपा नेते अनुपम खेर यांनी नसरुद्दीन शहा यांच्यावर टीका केली होती.
आता, भाजपा नेते आणि अभिनेते परेश रावल यांनीही सीएए आणि एनआरसीचं समर्थन करताना, विरोध करणाऱ्या नागरिकांना टोला लगावला आहे. प्रजासत्ताकदिनी अनेकांनी राहत इंदौरी यांच्या शायरीचा उल्लेख करत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तो शेर शेअर केला होता. तसेच, अनेक आंदोलनातही तोच शेर ऐकवला जातो. आता, परेश रावल यांनी त्यावरुनच विरोधकांना लक्ष्य केलं आहे. सभी का खून है शामिल यहाँ की मिठ्ठी मेकिसी के बाप का हिंदुस्थान थोडी है !!या शायरीला उत्तर देताना परेश रावल यांनी टोला लगावला.