कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव केल्यानंतर आता ममता बॅनर्जींच्यातृणमूल काँग्रेसनेभाजपाला अजून एक दणका दिला आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कोलकाता महानगरपालिका निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींच्यातृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. या निवडणुकीत निर्विवाद विजयाच्या दिशेने तृणमूल काँग्रेसची आगेकूच सुरू आहे.
कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये एकूण १४४ जागांपैकी तब्बल १३४ जागांवर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यापैकी ७ जागांवर तृणमूल काँग्रेसचा विजय झाला आहे. उर्वरित जागांपैकी चार जागांवर डावे, तीन जागांवर भाजपा, दोन जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.
आतापर्यंत सर्व पक्षांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास तृणमूल काँग्रेसने तब्बल ७४.२ टक्के मते मिळवली आहेत. तर भाजपाला ८ टक्के आणि डाव्या पक्षांना ९.१ टक्के मतांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस आणि इतरांच्या खात्यात ८.७ टक्के मते जमा झाली आहेत.
कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ११ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर ७ ते १० टेबलांवर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी केंद्रांवर तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तसेच २०० मीटर परिसरामध्ये कलम १४४ लागू करण्यात आलेले आहे. तसेच एकूण ३ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. या मतमोजणीमधून एकूण ९५० उमेदवारांच्या नशिबाचा फैसला होणार आहे.