नवी दिल्ली - भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच आयएनएस किल्तान दाखल होणार आहे. या युद्धनौकेच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची ताकत कैकपटीने वाढणार आहे. खास पाणबुडी विरोधी तंत्रज्ञान आयएनएस किल्तानचे वैशिष्टय आहे. शिवालिक, कोलकत्ता क्लास वर्गातील युद्धनौकानंतर आयएनएस किल्तान ही भारतातच विकसित करण्यात आलेली स्वदेशी बनावटीची युध्दनौका आहे.
- आयएनएस किल्तान हेवीवेट टॉर्पिडोज, एएसडब्ल्यू रॉकेटस, 76 एमएम कॅलिबर मिडियम रेंज गन, दोन 30 एमएम मल्टी बॅरल गन्स, फायर कंट्रोल सिस्टम आणि मिसाईल सिस्टमने सुसज्ज आहे तसेच किल्तान युद्धनौकेवर समुद्राच्या पोटात शोध घेणारे अत्याधुनिक सोनार आणि हवाई हालचालींवर लक्ष ठेवणा-या रेवती या दोन रडार यंत्रण बसवण्यात आल्या आहेत.
- कार्बन फायबरचा वापर करुन बांधण्यात आलेली ही भारतातील पहिली युद्धनौका आहे. कार्बन फायबरमुळे स्टेल्थ क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे शत्रूच्या रडारला चकवा देता येतो. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशात घुसून हल्ला करणे सोपे होते.
- लक्षद्विपमध्ये किल्तान नावाचे बेट आहे. त्यावरुन या युध्दनौकेला आयएनएस किल्तान नाव देण्यात आले आहे. दिल्लीपासून हे बेट 1,947 किलोमीटर अंतरावर आहे.
- भारतीय नौदलाच्या एका विभागाने आयएनएस किल्तानचे डिझाईन तयार केले. कोलकात्यातील गार्डन रिसर्च शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सने ही युद्धनौका बांधली आहे.
युध्दनौका बांधणीच्या क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे. भारतात वेगवेगळया राज्यांमध्ये अत्याधुनिक युद्धनौका बांधण्याचे काम सुरु आहे. मुख्य म्हणजे या युद्धनौकांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अनेक युद्धनौका नौदलाच्या ताफ्यातही दाखल झाल्या आहेत. भारताला चीन आणि पाकिस्तान या दोन देशांकडून सर्वाधिक समुद्री धोका आहे. भारतीय नौदलापुढे मुख्य आव्हान चीनचे आहे. चीननेही आपल्या नौदलाच्या आधुनिकीकरणाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई शहरावर 2008 सालच्या नोव्हेंबर महिन्यात दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी दहशतवादी समुद्रमार्गेच मुंबईत घुसले होते. त्यामुळे समुद्र सुरक्षेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.