- देवेश फडके
एक काळ असा होता, जेव्हा शताब्दी, राजधानी, यांसारख्या ट्रेननी आयुष्यात एकदा तरी प्रवास करावा अशी अनेकांची इच्छा असायची. मात्र, आता काळ बदलला आहे. आता वंदे भारत ट्रेनने एकदा तरी प्रवास करावा, असे भारतीय प्रवासी म्हणू लागले आहेत. अलीकडेच अमृत भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. जम्मू काश्मीरच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग लवकरच सुरू करण्यात येणार असून, या मार्गासाठी विशेष वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. भारतीय रेल्वेत अनेक सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. भारतीय रेल्वेचा संक्रमणाचा आणि कात टाकण्याचा काळ आहे. भारतीय रेल्वे प्रचंड कामगिरीच्या जोरावर अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावत आहे. करून दाखवले, अशी मानसिकता भारतीय रेल्वेची झालेली आहे. सन २०२४ उजाडले आहे. या आगामी वर्षात भारतीय रेल्वेचे काही महत्त्वाचे प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकतात. या प्रकल्पांची कामे सुरू असून, या वर्षाच्या अखेरीपर्यंत याचे लोकार्पण केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. यापैकी एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन.
विद्यमान वंदे भारत ट्रेन शताब्दी सेवांना पर्याय म्हणून सुरू करण्यात आली. तर भारतीय रेल्वेत सर्वांत वरचे आणि मानाचे स्थान असलेल्या राजधानी सेवांना पर्याय म्हणून आता वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन आणले जात आहे. मार्च २०२४ पर्यंत याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कदाचित जानेवारी महिन्यात स्लीपर वंदे भारत ट्रेनची प्रत्यक्ष एक झलक पाहायला मिळू शकते. BEML या कंपनीने स्लीपर वंदे भारतचे डिझाइन करण्यास सुरुवात केली असून, काही महिन्यांपूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर वंदे भारतचे आतील डिझाइन एक्सवरून शेअर केले होते. आकर्षक, अत्याधुनिक सोयींनी युक्त हे डिझाइन अनेकांच्या पसंतीस उतरले.
स्लीपर वंदे भारत ट्रेन आणण्यामागे भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट काय?
BEML ने तयार केलेले डिझाइन जवळपास फायनल असल्याची चर्चा आहे. याची प्रत्यक्ष बांधणीही सुरू करण्यात आली आहे. विद्यमान वंदे भारतनंतर आता स्लीपर वंदे भारत ट्रेन कशी असेल, याची उत्सुकता देशवासीयांमध्ये आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनचे प्रोटोटाइप व्हर्जन भारतीय रेल्वेला देण्यात येणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन तयार करण्याचा खर्च कमी आहे. याचे कारण ही ट्रेन देशातच तयार करण्यात आली आहे. ९० ते ९५ टक्के काम देशातील आहे. आताच्या घडीला एसी ट्रेनमध्ये जसे थ्री टियर एसी, टू टियर एसी आणि फर्स्ट एसी अशी रचना असते. त्याचप्रमाणे स्लीपर वंदे भारत ट्रेनची संरचना करण्यात आली आहे. तसेच या ट्रेनमध्ये पेन्ट्री कारही असणार आहे. याशिवाय गार्ड कोच, लगेज कोच असणार आहे. काश्मिर ते कन्याकुमारी अशा दीर्घ पल्ल्यासाठी ही ट्रेन तयार करण्यात येत असून, सर्व प्रकारच्या सोयी, सुविधा या ट्रेनमध्ये असणार आहे. प्रवाशांना प्रवास करताना सुलभता असावी, या गोष्टीवरही भर देण्यात आला आहे. या संपूर्ण ट्रेनमधून एकावेळी ८०० प्रवासी प्रवास करू शकतील, अशी रचना करण्यात येत आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन ताशी १६० किमी वेगाने धावू शकणार आहे. ३० ते ३६ तास प्रवास करायचा असेल, तर प्रवाशांसाठी कशा प्रकारे सोयी दिल्या जाऊ शकतात, यावरही भर देण्यात येत आहे. पेन्ट्री कारची क्षमता वाढवण्यात येत आहे. स्लीपर वंदे भारतमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित, सुलभ आणि आनंदानुभव मिळावा, याकडेही लक्ष देण्यात येत आहे. यादृष्टीनेच डबा आतून डिझाइन केला गेला आहे. विद्यमान राजधानी ट्रेनपेक्षा स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्याचा अनुभव अधिक सुखद असेल, असे सांगितले जात आहे.
अशी असेल स्लीपर वंदे भारत ट्रेनची कलर स्कीम
स्लीपर वंदे भारत ट्रेन १६ किंवा २४ डब्यांची असणार आहे. पैकी ११ डबे एसी थ्री टियर, ४ डबे एसी टू टियर आणि एक डबा फर्स्ट एसीचा असू शकतो, असा कयास बांधला जात आहे. आताच्या वंदे भारत ट्रेनमधील अनेक तांत्रिक गोष्टी स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये वापरण्यात येणार आहेत. यामुळेच ही ट्रेन कमी वेळेत प्रवाशांच्या सेवेत सादर करता येणे शक्य होणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनचा रंग कसा असेल, याबाबत भारतीय रेल्वे काही प्रयोग करणार असल्याचे म्हटले जात आहे. एक नवीन प्रकारची रंगसंगती पाहायला मिळू शकते. स्लीपर वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वेचा अभिमान ठरू शकते, अशी चर्चा आहे. रिडिंग लाइट, वरच्या बर्थवर चढण्यासाठीची शिडी, डब्यातील प्रकाश योजनेपासून ते टॉयलेटपर्यंत अनेक गोष्टींवर प्रवाशांच्या दृष्टीने विचार करून तयार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्येही ‘कवच’ यंत्रणा असेल.
सुरुवातीला २०० स्लीपर वंदे भारत ट्रेन आणण्याचे लक्ष्य
भारतीय रेल्वेने सुरुवातीला २०० स्लीपर वंदे भारत ट्रेन आणण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. पैकी ८० स्लीपर वंदे भारत ट्रेन बीईएमएल आणि टिटागड व्हॅगन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात येत आहेत. या स्लीपर वंदे भारतची निर्मिती आयसीएफमध्ये सुरू आहे. तर १२० स्लीपर वंदे भारत RVNL आणि एका रशियन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने तयार केल्या जात आहे. यासाठी रेल विकास निगम लिमिटेड या भारतीय रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या कंपनीने ‘Kinet Railway Solutions Limited’ नामक उपकंपनी स्थापन केली आहे. यातून स्लीपर वंदे भारतचे नवे डिझाइन तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अगदी अलीकडेच कायनेट या उपकंपनीने स्लीपर वंदे भारतचे नवे डिझाइन सादर केले आहे. याचे डिझाइन अधिक फ्युच्युरिस्टिक असल्याची चर्चा आहे. प्रोटोटाइप कोच तयार करतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे स्लीपर वंदे भारतचे आतील डिझाइन कसे असेल, याचा अंदाज बांधला जात आहे.
कायनेट-रशियन कंपनीने दिले स्लीपर वंदे भारतचे वेगळे डिझाइन
कायनेट आणि रशियन कंपनीने स्लीपर वंदे भारत ट्रेनसाठी हटके डिझाइन केले आहे. यासाठी मात्र रेल्वे मंत्रालयाची परवानगी किंवा शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. हे एक अगदी प्राथमिक स्वरुपाचे डिझाइन आहे. परंतु हे डिझाइन अनेकार्थी वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे. या ट्रेनच्या सुरुवातीला सिंहाच्या मुखाप्रमाणे रंगसंगती करण्यात आली आहे. हे मेक इन इंडियाचे प्रतिक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे. तसेच स्लीपर ट्रेनच्या आतील बर्थचे डिझाइन वेगळ्या स्वरुपाचे करण्यात आले आहे. या डिझाइनमध्ये स्लीपर ट्रेन अधिक प्रीमियम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या ट्रेनचे डिझाइन आंतरराष्ट्रीय स्तरावरील ट्रेनना चांगली टक्कर देणारे ठरू शकते, अशीही चर्चा आहे. तसेच सुरुवातीला बीईएमएल-टिटागड यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रोटोटाइप व्हर्जनची चाचणी देशभरात केली जाणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद, रेल्वेचे निकष, सुरक्षितता यामध्ये ही स्लीपर वंदे भारत ट्रेन पास झाली की, मोठ्या प्रमाणात याची निर्मिती सुरू करण्यात येणार आहे.
शेवटी, भारतीय रेल्वे स्लीपर वंदे भारत ट्रेनवर अधिक लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. ज्या पद्धतीने डिझाइन समोर येत आहे, ते पाहता स्लीपर वंदे भारत ट्रेन ही रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी ठरू शकते. स्लीपर वंदे भारत ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरू शकतो. स्लीपर वंदे भारत ट्रेनमुळे प्रवाशांचा स्लीपर ट्रेनने प्रवास करण्याचा अनुभव वेगळ्या उंचीवर जाऊ शकतो. आता वंदे भारत ट्रेनच्या तिकीट दरांमुळे सामान्य प्रवाशांसाठी अमृत भारत ट्रेनची निर्मिती करण्यात आली. अगदी त्याचप्रमाणे स्लीपर वंदे भारत ट्रेनचे तिकीट दरही जास्त असू शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी साधारण स्लीपर वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वेने सादर केल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको.