Ayodhya Ram Mandir And BJP: प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यापासून भारतासह जगभरात राम मंदिराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बालरुपातील रामलला दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. तर राम मंदिरात आल्यावर भाविक सढळ हस्ते दान, देणगी देत आहेत. उत्तर प्रदेशमध्येभाजपाची सत्ता आहे. तसेच लोकसभेसाठी उत्तर प्रदेश अतिशय महत्त्वाचे मानले जाते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होऊ शकेल, उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळू शकतील, याबाबत एक सर्व्हे करण्यात आला.
अयोध्येत राम मंदिर बांधणे हा भाजपाचा तीन दशकांपासूनचा अजेंडा आहे. आता राम मंदि झाले असून, त्याचा भाजपाला किती फायदा होणार या प्रश्नाच्या उत्तराची सर्वांना प्रतीक्षा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला आता काही दिवस राहिल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८० जागांवर या लोकसभा निवडणुकीत काय होणार? याचे उत्तर शोधण्यासाठी अनेक सर्व्हेंतून माहिती समोर येत आहे. आता निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात? याबाबत काही दावे या सर्व्हेत करण्यात आले आहेत.
भाजपाला बंपर विजयाचा अंदाज
या सर्व्हेत भाजपाला बंपर विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपा २०१४ मध्ये उत्तर प्रदेशातील विजयाचा आकडा पार करू शकतो, असा दावा केला जात आहे. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीला ८० पैकी ७८ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजपाला मोठा फायदा होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, या सर्वेक्षणानुसार, समाजवादी पक्षाला २ जागा मिळू शकतात. तर, काँग्रेस आणि बसपाचे खाते उघडताना दिसत नाही. अमेठी आणि रायबरेली या ठिकाणी काँग्रेसला पराभव पत्करावा लागू शकतो, असा दावा केला जात आहे. मागील निवडणुकीत अमेठीची जागा काँग्रेसने गमावली. पण, रायबरेलीमधून सोनिया गांधींना यश मिळाले. आता सोनिया गांधी राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रियांका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.