TMC Candidates List For Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. रविवारी तृणमूल काँग्रेसने (TMC) राज्यातील सर्व ४२ लोकसभा जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. ममता बॅनर्जी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युसूफ पठाणला देखील तिकीट दिले आहे. मूळचा गुजरातमधील असलेला पठाण लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात मैदानात आहे. सध्या अधीर रंजन चौधरी बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत आणि यावेळी त्यांना टीएमसीकडून युसूफ पठाणकडून टक्कर दिली जाईल.
विशेष बाब म्हणजे युसूफ पठाण गुजरातमधील असूनही त्याला लोकसभेसाठी पश्चिम बंगालमधून तिकीट का दिले गेले याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुका असो की लोकसभा निवडणुका, अधीर रंजन चौधरी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात नेहमीच शाब्दिक युद्ध रंगले आहे. अधीर रंजन पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत असतात. या मुद्द्यावरून अनेकदा ममता बॅनर्जी आणि अधीर रंजन यांच्यात शाब्दिक वार झाले आहेत.
ममता बॅनर्जींची मोठी खेळी!पश्चिम बंगालमधील इंडिया आघाडी तुटण्याचे कारण अधीर रंजन चौधरी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यामुळेच काँग्रेस आणि टीएमसीमध्ये जागावाटपावर कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. अधीर रंजन चौधरी १९९९ पासून बहरामपूरचे खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी टीएमसीच्या अपूर्ब सरकार यांचा पराभव केला. अधीर रंजन यांची त्यांच्या लोकसभा मतदारसंघावर चांगली पकड आहे. टीएमसीने युसूफ पठाणला उमेदवारी देण्यामागील कारण म्हणजे बहरामपूर हा मुस्लिमबहुल भाग आहे. युसूफ पठाणला तिकीट देऊन टीएमसीने अल्पसंख्याकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
जर आपण विधानसभा निवडणुकीबद्दल बोललो तर, बहारमपूरमधील सात विधानसभा जागांपैकी सहा जागा टीएमसीकडे आहेत, तर एक जागा भाजपकडे आहे. त्यामुळे लोकसभेसाठी टीएमसीने नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे. मूळचा गुजरातचा असलेला युसूफ पठाण फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. पण, रविवारी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत.