काश्मिरी पंडितांवरचा 'काश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा मुद्दा चर्चेत आला आहे. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांसोबत घडलेल्या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त होत आहेत. याशिवाय आता राजकीय पक्षांनीही या वादात उडी घेतली असून काश्मिरी पंडितांच्या हितासाठी केलेल्या कामावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. काश्मिरी पंडितांसाठी काय केलं हे नुकतंच काँग्रेसनं ट्विटरवर सांगितलं आणि भाजपवर अनेक आरोप देखील केले.
त्याचबरोबर सोशल मीडियावर काश्मिरी पंडितांबद्दलची वेगवेगळी तथ्ये शेअर करून किती काश्मिरी पंडित पुन्हा विस्थापित झाले आहेत याची माहिती दिली जात आहे. अनेक दावे केले जात आहेत. 1990 मध्ये झालेल्या या घटनेत किती काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून बाहेर काढण्यात आले आणि किती पंडित पुन्हा विस्थापित झाले याची नेमकी अधिकृत माहिती दिली जाहीर करण्यात आली होती हे जाणून घेऊयात.
संसदेत काय उत्तर देण्यात आलं होतं?काश्मीर खोऱ्यात 1990 मध्ये काश्मिरी पंडितांची किती कुटुंबे स्थलांतरित झाली होती आणि त्यानंतर दहशतवाद आणि इतर कारणांमुळे किती लोक तेथे स्थलांतरित झाले होते? त्याचबरोबर कलम 370 नंतर किती कुटुंबांचे पुनर्वसन झाले, असा सवाल या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिग्विजय सिंह यांनी सरकारला विचारला होता. यानंतर गृह मंत्रालयानं आपलं उत्तर देत याबाबत माहिती दिली आहे.
गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीर सरकारच्या आकडेवारीनुसार, 'मदत आणि पुनर्वसन आयुक्त (विस्थापित) जम्मू' कार्यालयात एकूण 44,684 काश्मिरी विस्थापित कुटुंबांची नोंदणी आहे. जर आपण त्यांच्या संख्येचा विचार केला तर ते 1,54,712 लोक आहेत. यावरून त्या वेळी किती काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून देण्यात आलं होतं याचा अंदाज येतो.
किती लोक विस्थापित झाले?त्याचवेळी, विस्थापित लोकांबद्दल माहिती दिली तर, काश्मिरी विस्थापित कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या उद्देशाने, जम्मू आणि काश्मीर सरकारने 5 ऑगस्ट 2019 पासून अशा 1697 व्यक्तींना नियुक्ती दिली आहे आणि अतिरिक्त 1140 व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या दाव्यानुसार यूपीए सरकारने जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांसाठी ५२४२ घरे बांधली. याशिवाय पंडितांच्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत देण्यात आली, यामध्ये पंडितांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना 1168 कोटींची शिष्यवृत्ती आणि शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांचा समावेश आहे.
चित्रपट कसा आहे?विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांड आणि त्यांच्यावरील अत्याचारांवर आधारित चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा निर्माता अभिषेक अग्रवाल आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात 90 च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कथा दाखवण्यात आली आहे. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्तीसारखे दिग्गज कलाकार आहेतच पण त्याचबरोबर पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार सारखे अनुभवी कलाकार देखील या चित्रपटात आहेत.
काय आहे चित्रपटाची कथा?चित्रपटाची कथा काश्मीरमधील शिक्षक पुष्कर नाथ पंडित (अनुपम खेर) यांच्या जीवनावर आधारित आहे. आजोबा पुष्करनाथ पंडित यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्णा (दर्शन कुमार) दिल्लीहून काश्मीरला येतो. कृष्णा त्याच्या आजोबांचा जिवलग मित्र ब्रह्मा दत्त (मिथुन चक्रवर्ती) सोबत राहतो. त्यादरम्यान पुष्करचे इतर मित्रही कृष्णाला भेटायला येतात. यानंतर चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो.
1990 पूर्वी काश्मीर कसे होते हे फ्लॅशबॅकमध्ये दाखवले आहे. यानंतर 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांना धमकावले गेले आणि काश्मीर आणि त्यांचे घर सोडण्यास भाग पाडले गेले याची वेदनादायक कहाणी आहे. कृष्णाला माहित नाही की त्या काळात त्याच्या कुटुंबाला कोणत्या कठीण प्रसंगातून जावे लागले असेल. यानंतर ९० च्या दशकातील घटनांचे पदर त्याच्यासमोर उलगडले जातात आणि त्या काळात काश्मिरी पंडितांना काय वेदना झाल्या हे दाखवले जाते. याभोवती संपूर्ण कथा फिरते.