छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत (Chhattisgarh Naxal Attack) सुरक्षा दलाचे 22 जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत चार नक्षली आणि एक नक्षल समर्थक (मिलिशिया सदस्य) मारल्या गेल्याची कबुली नक्षल्यांनी प्रसिद्धी पत्रकातून छत्तीसगडमधील प्रसार माध्यमांकडे दिली आहे. याचवेळी बेपत्ता असलेला जवान आपल्या ताब्यात असून त्याला सोडण्यासाठी मध्यस्थाचे नाव जाहीर करण्याचे आवाहनही त्यांनी सरकारला केलं आहे. 31 जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
शहीद झालेल्या जवानांमध्ये किशोर एंड्रीक यांचाही समावेश आहे. किशोर एंड्रीक शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांना आणि पत्नीला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. कारण लग्नाच्या 19 वर्षानंतर त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. मात्र बाळाचा चेहरा पाहण्याआधीच किशोर यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. किशोर लग्नाच्या 19 वर्षानंतर बाप होणार होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान किशोर यांनी आपल्या भावाला देखील वाचवण्याचा खूप प्रयत्न केला.
किशोर यांचे भाऊ हेमंत एंड्रीक देखील दुसऱ्या एका ग्रुपमधून नक्षलवाद्यांसोबत लढत होते. मात्र त्यांना आपला जीव गमवावा लागला. किशोर बीजापूरच्या चेरपालचे रहिवासी होते. 2002 मध्ये किशोर आणि रिंकी यांचा लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर कित्येक वर्षे त्यांना बाळ नव्हतं. पण त्यानंतर आता रिंकी चार महिन्यांच्या गर्भवती आहेत. किशोर यांच्या निधनाने त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. गावात किशोर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी गर्दी केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नक्षलवाद्यांनी चकमकीनंतर मारल्या गेलेल्या जवानांकडील शस्त्रे नक्षल्यांनी पळवून नेली. त्यात 14 अत्याधुनिक रायफली आणि दोन हजारावर काडतुसांचा समावेश आहे. त्याचा एक फोटोही दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता विकल्प याने जारी केला आहे. नक्षल्यांच्या ताब्यात असलेल्या जवानाला सोडण्यासाठी त्यांनी काही अटी टाकल्या आहेत. त्यावर वाटाघाटी करण्यासाठी त्यांना मध्यस्थीची गरज भासत असल्याचे दिसून येते.