नवी दिल्ली - स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचा उत्सव सध्या देशामध्ये उत्साहात साजरा होत आहे. यादरम्यान, १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. सध्या देशामध्ये कोरोनाचे सरासरी १५ हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारानेस्वातंत्र्य दिनी कुठलीही मोठी सभा होणार नाही, हे निश्चित करण्याची सूचना राज्यांना दिली आहे. तसेच सर्वांनी कोरोनाबाबतच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे, अशी सूचनाही केंद्राकडून देण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व प्रमुख ठिकाणी स्वच्छ भारत अभियान चालवण्याची आणि स्वैच्छिक नागरिक भागिदारीच्या माध्यमातून त्यांना स्वच्छ ठेण्यासाठी पंधरवडा ते महिनाभर हे अभियान सुरू ठेवण्यास सांगितले आहे.
मंत्रालयाने एका पत्रकामध्ये सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून कोविड-१९ पासून बचावासाठी समारंभात मोठ्या सभा टाळल्या पाहिजेत. कोविड-१९ बाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करणं आवश्यक आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी अद्ययावत केलेल्या आकड्यांनुसार देशामध्ये कोविड-१९च्या १६ हजार ५६१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या वाढून ४ कोटी ४२ लाख, २३ हजार ५५७ एवढी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांचा विचार केल्यास ती संख्या १ लाख २३ हजारांपर्यंत पोहोचली आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने सरकारी विभाग आणि शैक्षणिक संस्थांना पर्यावरण संरक्षणासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी वृक्षारोपनाचा कार्यक्रम चालवण्याचीही सूचना दिली आहे.