ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - जलिकट्टू या पारंपरिक खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. ती बंदी हटवण्यात यावी या मागणीसाठी गेल्या आठवड्याभरापासून मरीना बीचवर आंदोलन करणा-यांवर पोलिसांनी आज कारवाईचा बडगा उगारला. मरीना बीचवरील जागा खाली करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. तर काल जलिकट्टू खेळताना पडुकोट्टईत दोन जणांचा तर अन्य एका ठिकाणी एकाचा मृत्यू झाला आहे. कॉलेज युवकांनी देखील मोठ्या प्रमाणात विरोध करण्यास सुरवात केली आहे. दोन-तीन दिवसांपासून स्थानिक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सामान्य व्यक्तींपासून ते असामान्य व्यक्तीपर्यंत तामिळनाडू मधील सर्व जण न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध एकवटले आहेत.
जलिकट्टू हा खरे तर तामिळनाडूचा गावागावात चालणारा एक पारंपरिक उत्सव आणि खेळ प्रकार. पोंगल सणादरम्यान साजरा करण्यात येतो. या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. जलीकट्टू या खेळाचा अर्थ आहे वळूंना (देशी बैल) काबूत आणने. या खेळाला २००० वर्षांची परंपरा आहे. जाणून घेऊया या पारंपारिक खेळाविषयी.
जलिकट्टू खेळताना अत्यंत उत्तम अश्या देशी बैलांचे प्रदर्शन भरवले जाते. बैलाची निगा किती उत्तम प्रकारे राखली आहे, त्याचा डौल आणि त्याचा सुदृढता हे निकष असतात. या सर्व बैलांमध्ये शर्यत लावली जाते, यावेळी बैलांबरोबर त्याच्या वाशिंडाला ( पाठीवरचा उंचवटा) धरून 60 सेकंदापर्यंत त्याच्या मालकाने पळणे हे देखील एका शर्यतीचे स्वरूप असते. बैलाच्या शिंगाला नाणी बांधून ते हस्तगत करणे हे देखील यामध्ये सामील असते.
या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे वर्षभर बैल आपल्यासाठी राबतो तर वर्षातून एक दिवस आपण बैलाबरोबर खेळले पाहिजे असा असतो आणि या एका प्रतिष्ठित खेळासाठी शेतकरी अत्यंत प्रेमाने आपल्या बैलाला तयार करतात. या खेळामध्ये जर्सी बैल चालत नाही. आणि जर्सी बैल या शर्यतीत टिकत देखील नाही. या शर्यतीत गावागावातून बैल भाग घेतात आणि भाग घेतलेल्या धष्टपुष्ट बैलांमध्ये सर्वात उत्तम बैलाला गावनंदीचा मान मिळतो आणि त्या गावातील गोवंश संवर्धनाचे काम तो करतो.
PETA ( People for the Ethical Treatment of Animals ) या अमेरिकन संस्थेच्या भारतीय शाखेने या खेळामुळे बैलाला क्रूरतेची वागणूक मिळते असा दावा करून न्यायालयात या खेळावर बंदी आणण्याची मागणी केली. आणि न्यायालयाने ती मान्य करून ही बंदी आणली आहे.