नवी दिल्ली: राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. सिंगापूरमधल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे एकेकाळचे अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अमर सिंह यांची प्रकृती गेल्या अनेक महिन्यांपासून नाजूक होती.पंतप्रधान मोदींनी ट्विट करून अमर सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 'अमर सिंह अतिशय उत्साही व्यक्तीमत्त्व होतं. गेल्या काही दशकांत त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी अतिशय जवळून पाहिल्या. त्यांचे अनेकांशी मित्रत्वाचे संबंध होते. त्यांच्या मृत्यूमुळे दु:ख झालं. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंब आणि मित्र परिवारासोबत आहेत,' अशा शब्दांत मोदींनी सिंह यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं.
गेल्या काही महिन्यांपासून अमर सिंह यांच्यावर सिंगापूरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. ते आयसीयूमध्ये होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. ५ जुलै २०१६ रोजी त्यांची खासदार म्हणून निवड झाली. समाजवादी पक्षापासून दूर गेल्यानंतर त्यांची राजकारणातील सक्रियता कमी झाली होती. प्रकृतीच्या समस्या उद्भवण्यापूर्वी ते भाजपाच्या जवळ गेले होते. देशात यूपीएचं सरकार असताना आणि समाजवादी पक्षात मुलायम सिंह यादव यांचा शब्द अंतिम समजला जात असताना अमर सिंह यांनी राष्ट्रीय राजकारणात पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.