कोच्छी प्रकल्पाला मिळणार गती भूसंपादन सुरू करा: मुख्यमंत्र्यांचे निर्देश
By admin | Published: December 19, 2014 10:57 PM
नागपूर: नागपूर शहराला पाणीपुरवठा करण्यास महत्त्वपूर्ण ठरू शकणारा कन्हान नदी प्रकल्पासाठी (कोच्छी बॅरेज) भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नागपूर: नागपूर शहराला पाणीपुरवठा करण्यास महत्त्वपूर्ण ठरू शकणारा कन्हान नदी प्रकल्पासाठी (कोच्छी बॅरेज) भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.विधानभवन परिसरात यासंदर्भात एक बैठक झाली. त्यात मुख्यमंत्र्यांनी कन्हान नदी प्रकल्पाचा आढावा घेतला. हा प्रकल्प महत्त्वाचा असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, त्यामुळे या प्रकल्पाला गती द्या, पुनर्वसन आराखडा सादर करा, असे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. नागपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या कन्हान नदीवर धरण नाही. त्यामुळे सावनेर तालुक्यातील कोच्छी गावाजवळ या नदीवर बॅरेज बांधण्यास २००७ मध्ये मंजुरी मिळाली होती. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील ७२ हेक्टर वन जमिनीची गरज असून त्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. बैठकीला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुनील केदार, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)