देहरादून : उत्तराखंडमध्ये सरकारने जाहिरातीसाठी क्रिकेटपटू विराट कोहलीला केदारनाथ पूरग्रस्तांच्या मदतनिधीतून ४७ लाख १९ हजार रुपये दिले होते का? हे खरे की खोटे हे स्पष्ट व्हायचे आहे. मात्र भाजप नेत्याने हा आरोप माहितीच्या अधिकाराद्वारे मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे केला असला तरी उत्तराखंड सरकार आणि विराट कोहली यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. उत्तराखंडातील विधानसभेसाठीचे मतदान संपले असून त्यानंतर हा वाद पेटला आहे. विराटला पर्यटन जाहिरातीसाठी सरकारने ही रक्कम दिली होती. तो तेव्हा राज्याचा ब्रॅण्ड अॅम्बेसडर होता. विराटचे प्रतिनिधी आणि कॉर्नेस्टोन स्पोर्टस् अॅण्ड एंटरटेन्मेंटचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी बंटी सजदेह यांनी असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगितले. या आरोपांबाबत मुख्यमंत्री हरीश रावत यांचे माध्यम सल्लागार सुरेंद कुमार म्हणाले की, पर्यटन राज्याची जीवनरेखा आहे. राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी एखाद्या स्टारची निवड करण्यात आली असेल तर त्यात गैर काय आहे? सर्वकाही कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात आले असून, आलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. केदारनाथचा पुन्हा विकास करण्यास आमच्या सरकारचे प्राधान्य होते हे जनतेला ठाऊक आहे. भाजप निवडणुकीत पराभूत होत असल्यामुळे चुकीच्या गोष्टी पसरवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोहलीशी संबंधित व्यवहाराबाबत मी संबंधित विभागाकडे माहिती मागविणार आहे. कोहलीला पैसे देण्यात आले होते, असे केवळ भाजपचे म्हणणे आहे. क्रिकेटपटूचे प्रतिनिधी त्यांना कोणताही पैसा मिळाला नव्हता, असे म्हणत आहेत. भाजप नेते अजेंद्र अजय यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून हे प्रकरण उजेडात आणले होते. एक मिनिटाच्या व्हिडिओसाठी विराट कोहलीला जी रक्कम देण्यात आली ती पूर मदतनिधीतूनच देण्यात आली होती. ही रक्कम रुद्रप्रयागच्या आपत्ती निवारण प्राधिकरणामार्फत देण्यात आली होती, तसेच त्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी घेण्यात आली होेती. विराट कोहलीला गायक कैलाश खेर यांच्या कैलाशा एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लि.च्या मार्फत हा पैसा देण्यात आला होता, असे नेत्याचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)विराटचे प्रतिनिधी आणि कॉर्नेस्टोन स्पोर्टस् अॅण्ड एंटरटेन्मेंटचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी बंटी सजदेह यांनी असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगितले आहे. केदारनाथवरील व्हिडिओला भाजपचा विरोधभाजपने गेल्या वर्षी गायक कैलास खेर यांना ३ कोटी ६६ लाख रुपये देऊन केदारनाथवर व्हिडिओ तयार करण्यासही विरोध केला होता. भाजपने केदारनाथावरील मालिकेलादेखील विरोध केला होता. मंदिराची कवाडे बंद होत असतानाही ही मालिका प्रसारित करण्यात येणार असल्यामुळे आपण विरोध करीत असल्याचे भाजपने म्हटले होते.
पूरग्रस्तांच्या मदतनिधीतून कोहलीला रक्कम?
By admin | Published: February 25, 2017 11:30 PM