कोलकाता - कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने क्लीन स्विप करत विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसच्या या लाटेत भाजपा, डावे, काँग्रेस सर्वच पक्ष पालापाचोळ्यासारखे उडून गेले. मात्र या लाटेत भाजपाच्या एका महिला नेत्याने भक्कमपणे पाय रोवर विजयाचा षटकार ठोकला. भाजपाच्या या महिला नेत्याचं नाव आहे मीनादेवी पुरोहित. त्यांनी कोलकाता महापालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा त्सुनामी आला असताना पुन्हा एकदा विजयाचा झेंडा रोवला.
कोलकातामधील वॉर्ड क्रमांक २२ मधून जिंकणाऱ्या मीनादेवी पुरोहित यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सहाव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्याने मी खूश आहे. हा जनता आणि भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे. जे जनतेचे काम करतात ते शेवटी जिंकतात. येथील मतदान प्रक्रिया निष्पक्ष नव्हती. जर ही प्रक्रिया निष्पक्ष असती तर भाजपा अधिक जागांवर जिंकली असती.
बारावी पास असलेल्या मीनादेवी पुरोहित यांनी जोडासांको विधानसभा मतदारसंघामधूनही विजय मिळवला होता. काम करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची प्रतिमा आहे. तर ५० नंबर वॉर्डमधून विजयी झालेले सजल घोष यांचे वडीलही आधी नगरसेवक राहिले आहेत. ते पूजा मंडळांशी संबंधित आहेत.
वॉर्ड क्र. २२ मध्ये येणारा बडा बाजार भार हा नेहमीच भाजपाच्या बाजूने राहिला आहे. येथे ७० टक्के व्यावसायिक राहतात. त्यामध्ये राजस्थानमधील मारवाडी समुदाय आणि गुजराती लोक अधिक आहेत. बडा बाजार हिंदी भाषिक भाग आहे. तसेच पूर्व भारतातील हा सर्वात मोठा बाजार आहे.
दरम्यान, कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. येथे ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने १४४ जागांपैकी आतापर्यंत ११२ जागा जिंकल्या आहेत. तर २२ जागांवर तृणमूलचे उमेदवार आघाडीवर आहेत. या निवडणुकीत अन्य कुटल्याही पक्षाला दुहेरी जागाही जिंकता आलेल्या नाहीत.