कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीपासून भाजपा आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष होताना पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. त्यामुळे येथील राजकीय वातावरण तापले होते. यातच आता वीज दरवाढीविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात भाजपाने आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन चिघळले असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे आणि लाठीचार्ज केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी काकीनाडा परिसरात कथित पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यात अर्जुन सिंह जखमी झाले होते. यावेळी त्यांना भाटपारा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अर्जुन सिंह यांच्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज विरोधात भाजपाने बैरकपूर आणि बारासात परिसरात सोमवारी बंद पुकारला होता. यादरम्यान भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता. यात जवळपास 25 भाजपाचे कार्यकर्ते जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते.