CBI raids Sandip Ghosh, Kolkata Case: कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आरजी कार हॉस्पिटलमधील कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांच्या घरी पोहोचले. याशिवाय सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजीचे प्रात्यक्षिक डॉ. देबाशीष सोम यांच्या घरासह आणखी चार ठिकाणी छापे मारले.
सीबीआयची एक टीम डॉ. संदीप घोष यांच्या निवासस्थानी पोहोचली, दुसरी टीम आरजी कारमधील फॉरेन्सिक मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. देबाशिष सोम यांच्या घरी आणि तिसरी टीम आरजी कार हॉस्पिटलचे माजी एमएसव्हीपी संजय वशिष्ठ यांच्या घरी पोहोचली. रुग्णालयाचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी डॉ. देबाशिष सोम यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात होत असलेल्या भ्रष्टाचार व अनियमिततेबाबत तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राफ चाचणी तुरुंगातच होणार असून, तो १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. उर्वरित सहा जणांची चाचणी सीबीआय कार्यालयात सुरू आहे. संजय हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याने त्याची पॉलीग्राफ चाचणी आवश्यक आहे. त्याच्याकडून गुन्हा केव्हा आणि कसा केला, त्याच्यासोबत आणखी कोणी सहभागी आहे का, याची माहिती घ्यायची आहे. नवव्या दिवशीही त्याला प्रश्न विचारले जात आहेत. आतापर्यंत त्याची 100 तासांहून अधिक चौकशी करण्यात आली आहे. तशातच माजी प्राचार्य संदीप घोष हे सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
सीबीआयकडून तपासाला वेग
या प्रकरणात, उर्वरित चार कनिष्ठ डॉक्टर त्या रात्री घटनास्थळी असल्याने त्यांची चाचणी घेण्यात आली. या प्रकरणाशी संबंधित सत्य आणि वास्तव ते सांगू शकतात. पीडित लेडी डॉक्टर घटनेच्या आदल्या रात्री त्यांच्यासोबत जेवली होती. त्या रात्री काय घडले याबाबत माहिती मिळू शकते. एका वॉलेंटियरचीही चाचणी घेण्यात आली, कारण त्याच्याकडे बरीच माहिती होती. कोलकाता बलात्कार प्रकरणाचे गूढ उकलण्यात सीबीआय सातत्याने गुंतले आहे, परंतु अद्याप आरोपी संजय रॉयच्या अटकेशिवाय कोणतीही कारवाई झाली नव्हती. तशातच आता सीबीआयने केलेल्या छापेमारीमुळे तपासाला वेग आल्याची चर्चा आहे.