ओडिशातील कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताने देश हादरला. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. तर ११०० हून अधिकजण जखमी झाले आहेत. केंद्र सरकारने मृत व जखमींना मदत जाहीर केली आहे. दरम्यान या रेल्वे अपघातात पश्चिम बंगालमधील अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पीडितांसाठी मोठी घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.
पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, कोरोमंडल एक्स्प्रेसमधून प्रवास करते होते आणि सध्या मानसिक आणि शारीरिक आघातातून जात असलेल्या राज्यातील लोकांना बंगाल सरकार रोख मदतही करणार आहे. दरम्यान, वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या अपघातातील जखमी प्रवाशांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी मंगळवारी भुवनेश्वर आणि कटकला भेट देणार आहेत.
सध्या पश्चिम बंगालमधील 206 जखमी प्रवाशांना ओडिशाच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातावर कोणत्याही प्रकारचे राजकारण करू इच्छित नाही आणि जखमी प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करू, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच, रेल्वे अपघातात जखमी झालेल्या राज्यातील प्रवाशांच्या उपचार आणि पुनर्वसनावर देखरेख करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी दिवसाच्या शेवटच्या क्षणी दार्जिलिंगचा चार दिवसांचा दौरा रद्द केल्याचे सूत्रांनी सांगितले.
रेल्वेकडून 10 लाखांची मदतअपघातातील मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही आपापल्या राज्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.