कोलकात्यामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचं प्रकरण चिघळलं असून, या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या घटनेविरोधात ट्रेनी डॉक्टर्सकडून आंदोलन आणि संप आदी मार्गांनी निषेध नोंदवण्यात येत आहे. दरम्यान, संपकर्त्या डॉक्टरांबाबत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या अरुप घोष यांनी महिला डॉक्टर त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत आहेत, मात्र कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्यांना आम्ही वाचवू शकणार नाही, असं विधान केलं आहे. तर भाजपा या प्रकरणी राजकारण करत आहे. महिलांनी रात्रीची ड्युटी करता कामा नये, असा सल्ला माजिद मेमन यांनी दिला आहे.
आरजी कर मेडिकल कॉलेजमधील बलात्कार आणि मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. तर या घटनेविरोधात डॉक्टरांचा संप सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे खासदार अरुप घोष यांनी धमकीवजा इशारा देत एक विधान केलं आहे. महिला डॉक्टरांना त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत जायचं आहे. किंवा त्यांच्या घरी जायचं आहे. त्यांना जायचं असेल तर जाऊ दे, पण एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर ते त्यांना सोडणार नाही.
घोष पुढे म्हणाले की, संपामुळे जर जनतेचा उद्रेक डॉक्टरांविरोधात झाला, तर आम्ही त्यांना वाचवू शकणार नाही. आंदोलनाच्या नावावर तुम्ही घरी जाऊ शकता किंवा बॉयफ्रेंडसोबत फिरायला जाऊ शकता. मात्र तुमच्या संपामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला आणि जनतेचा उद्रेक तुमच्याविरोधात झाला तर आम्ही वाचवू शकणार नाही, असं विधान घोष यांनी केलं.