भारतीय जनता पक्षाने (भाजप) आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा दाखला देत भारतातील लोकशाही शरमेने झुकली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर ते विचारू इच्छितात की ममता बॅनर्जी यांना अजूनही त्यांच्या पदावर राहायचं आहे का?
आता निष्पक्ष चौकशीसाठी ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा. ममता बॅनर्जी यांना सर्व काही माहीत होतं. गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आणि पुरावे नष्ट करण्यात त्यांचा सहभाग होता, त्यामुळे त्यांची पॉलिग्राफ चाचणीही झाली पाहिजे आणि ममता यांना अटकही झाली पाहिजे, जेणेकरून सत्य बाहेर येईल असं भाटिया म्हणाले.
आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणावरील सुनावणी दोन तास चालली. आजच्या सुनावणीत एका बाजूला संविधानाचे रक्षक आणि दुसरीकडे संविधानाचे भक्षक यांच्यात लढाई झाली. पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं त्यांना योग्य वाटलं नाही असं गौरव यांनी सांगितलं. आमचे डॉक्टर आणि महिलांचा सरकारवर विश्वास असला पाहिजे, तुम्ही त्यांना सुरक्षा द्या, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ममता बॅनर्जी यांच्यावर आहे. आता त्या काय करणार हा मोठा प्रश्न आहे असंही म्हटलं.
राहुल गांधींच्या विधानाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गौरव भाटिया म्हणाले की, राहुल गांधी हे अपरिपक्व आणि पार्ट टाईम नेते आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, पण विरोधी पक्षनेते झाल्यानंतर जनतेने त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. पण, आज खेदाने म्हणावे लागेल की, राहुल गांधी हे भारताच्या लोकशाहीवरील काळा डाग आहेत. परदेशात गेल्यावर काय बोलावे तेही कळत नाही. ज्या संविधानाला घेऊन ते फिरतात ते त्यांनी कधीच वाचले नाही असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.