CBI ने आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्रिन्सिपल संदीप घोषला कोलकाता येथील ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. बुधवारी (१८ सप्टेंबर) न्यायालयात दिलेल्या जबाबात संदीप घोष हा संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याऐवजी घटनास्थळावर जाणीवपूर्वक अनुपस्थित होता, असं म्हटलं होतं. संदीप घोष दुसऱ्या कोणाशी तरी बोलून त्याचा आदेश ऐकत असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सीबीआय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पोलिसांचे पथक गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर संदीप घोष हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तोपर्यंत घोषने पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिजीत मंडल यांच्याशी अनेकदा चर्चा केली. घोष आणि मंडल यांच्या मोबाईलमध्ये अनेक गुपितं लपलेली असल्याचं सीबीआयने स्पष्टपणे सांगितलं आहे. याशिवाय घोषने रुग्णालयातील अनेक अधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती.
गुन्ह्याच्या ठिकाणी छेडछाड केल्याचा आरोप तपास यंत्रणेने यापूर्वीच केला आहे. सीबीआयने संदीप घोषची अनेकवेळा चौकशी केली आणि या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याने कोणते पाऊल उचलले हे जाणून घेतलं. घोषने तपासकर्त्यांना सांगिंले की त्याने अनेक अधिकाऱ्यांशी बोलून डॉक्टरांचे तीन सदस्यीय मंडळ तयार केले. त्याचा सर्व तपशील आरोग्य विभागाला पाठवण्यात आला असून सायंकाळी पाच वाजता डॉक्टरांच्या मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.
सीबीआयने संदीप घोषवर कोणते आरोप केले?
ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी सीबीआयने आरजी करचे माजी प्रिन्सिपल संदीप घोषला अटक केली आहे. अटकेत असलेल्या घोषवर आता पुराव्याशी छेडछाड आणि कट रचल्याचा आरोप आहे. ज्युनिअर डॉक्टर्स आणि ट्रेनी डॉक्टरच्या पालकांनी सखोल चौकशीची मागणी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.