"ममता बॅनर्जींना कोलकाता प्रकरणाची चौकशी व्हावी असं वाटत नाही, अनेक गुपितं उघड होतील"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:49 IST2024-08-29T17:47:45+5:302024-08-29T17:49:07+5:30
Kolkata Doctor Case : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आता ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला आहे.

"ममता बॅनर्जींना कोलकाता प्रकरणाची चौकशी व्हावी असं वाटत नाही, अनेक गुपितं उघड होतील"
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून राजकारण सुरू झालं आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आता ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला आहे.
कोलकाता बलात्कार प्रकरणाच्या विरोधात काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोलकाता येथे निदर्शने केली. यावेळी अधीर रंजन चौधरी यांनी काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केला. या निदर्शनात काँग्रेस कार्यकर्ते पक्षाचे झेंडे फडकावत घोषणाबाजी करत होते. याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता यांच्यावर घणाघात केला.
"आम्ही बंगालच्या लोकांच्या आणि मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या मागण्यांमध्ये सहभागी आहोत. खुद्द ममता बॅनर्जी यांना या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी असं वाटत नाही कारण अनेक गुपितं उघड होतील, त्यांना हे घडू नये असं वाटतं. त्यामुळे त्या दुसरं काहीतरी बोलून आणि लोकांना घाबरवून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत पण लोक त्यांना सोडणार नाहीत. कारण हे एक जनआंदोलन बनलं आहे" अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर आरोप करत चौधरी यांनी म्हटलं की, "त्या ज्युनियर डॉक्टरांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेव्हा त्यांना समजलं की लोक निर्भय आहेत आणि ते घाबरत नाहीत, तेव्हा त्या आपलं विधान मागे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक ममता बॅनर्जींना घाबरत नाहीत. त्यांना असं वाटतं की त्यांच्या हातात बरेच गुंड आहेत जे दहशत पसरवतील पण त्यांना कोणी घाबरत नाही."