कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. ट्रेनी डॉक्टरचे वडील सांगतात की, त्यांची मुलगी फक्त एकच काम करायची आणि ते म्हणजे अभ्यास, अभ्यास आणि फक्त अभ्यास. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती, गरिबी होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि एडमिशनसाठी खूप कष्ट केले आणि तिचं स्वप्न पूर्ण केलं.
मुलीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडली नाही. आता मी एकच काम करू शकतो आणि ते म्हणजे दोषींना शिक्षा देऊ शकतो. रात्री ड्युटी संपवून झोपलेल्या ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येबद्दल देशात आणि जगात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरजी कर कॉलेजच्या प्रिन्सिपलची चौकशी केली जात आहे ज्यांच्यावर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
देशभरात डॉक्टरांचे आंदोलन आणि संप सुरू आहेत. द गार्डियनच्या वृत्तानुसार, लेडी डॉक्टरचे वडिलांनी आपल्या मुलीच्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी ते खूप भावुक झाले. मुलीची एकच इच्छा होती की, तिने मेडिसिनमध्ये करिअर करावं. जेव्हा त्यांनी आपल्या मुलीला शेवटचं पाहिलं, तेव्हाचा दिवस आठवून वडील म्हणतात की, पश्चिम बंगालच्या कल्याणी येथील कॉलेज ऑफ मेडिसिन आणि जेएनएम हॉस्पिटलच्या लिस्टमध्ये तिचं नाव आलं होतं.
वडील टेलर म्हणून काम करतात आणि मोठ्या कष्टाने त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे उभे केले होते. मुलीने वडिलांना सांगितलं होतं की तिला डॉक्टर व्हायचं आहे. पप्पा, डॉक्टर बनून इतरांना मदत करणे ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्नही विचारला होता. त्यावर वडील म्हणाले- ठीक आहे, तू कर. आम्ही तुला सर्व मदत करू. मुलीसोबत घडलेल्या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आता मी कधीच हसू शकणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.