कोलकाता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरण गुंतागुंतीचे होत आहे. या प्रकरणी आतापर्यंत संजय राय याला अटक करण्यात आली आहे. याच दरम्यान पीडितेच्या आई-वडिलांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
आरजी कर रुग्णालयातील आंदोलक डॉक्टरांसोबत सहभागी झालेल्या मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी कोलकाता पोलिसांनी मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. महिला डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं की, आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह ठेवायचा होता, पण आमच्यावर खूप दबाव टाकण्यात आला आणि तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला बाजूला घेऊन पैसे देऊ केल्याचा आरोपही पीडितेच्या वडिलांनी केला आहे. त्यांच्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर आणि अंत्यसंस्काराआधी घरी आणण्यात आला. मात्र मुलीच्या वडिलांनी पैसे घेण्यास नकार देत आपलं मत मांडलं.
या प्रकरणी टीएमसीने महिला डॉक्टरच्या पालकांच्या वतीने पोलिसांनी दबाव आणल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. टीएमसीचे म्हणणे आहे की पालकांचा अलीकडील व्हिडीओ हा पुरावा आहे की त्यांच्यावर कोणताही दबाव आणला गेला नाही, परंतु कुटुंबाने यावर लगेच प्रतिक्रिया दिली आणि दावा केला की पोलिसांनी अंत्यसंस्कारानंतर लगेचच जबरदस्तीने व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.
टीएमसीचे नेते आणि मंत्री शशी पांजा म्हणतात की, पालकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये असे आरोप खोटे असल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्ही सर्वजण पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी करत आहोत, मात्र येथे राजकारण होता कामा नये. आम्ही नम्रपणे आवाहन करू इच्छितो की पालकांवर कोणताही राजकीय दबाव आणू नये असं सांगितलं.
पांजा यांच्या विधानानंतर अवघ्या तासाभरात, एका बंगाली वृत्तवाहिनीशी बोलताना पीडितेच्या पालकांनी दावा केला की घटनेच्या काही दिवसांनंतर पोलिसांनी जबरदस्तीने व्हिडीओ शूट केला होता. पोलिस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असून संदीप घोष यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पालकांनी सांगितलं.