कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील गोंधळ दिवसागणिक वाढत चालला आहे. याच दरम्यान, मंगळवारी रुग्णालयातील किमान ५० डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. बलात्कार आणि हत्येची बळी ठरलेल्या ट्रेनी डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी ५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करणाऱ्या डॉक्टरांनी एकजूट करून हे पाऊल उचललं आहे. रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली.
पश्चिम बंगालमधील इतर वैद्यकीय महाविद्यालयातील काही वरिष्ठ डॉक्टरांनी देखील सांगितलं की, ते देखील एकजुटीने राजीनामा देऊ शकतात. शहरातील सात कनिष्ठ डॉक्टरांचं बेमुदत उपोषण आणि राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील त्यांच्या सहकाऱ्यांनी एकजुटीने केलेल्या १२ तासांच्या लाक्षणिक उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता हे सुरू आहे.
सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या संघटनांपैकी एक असलेल्या असोसिएशन ऑफ हेल्थ सर्व्हिसेस डॉक्टर्सचे प्रतिनिधी डॉ मानस गुमटा म्हणाले की, "जर सरकार आंदोलक ज्युनियर डॉक्टरांचे वाजवी आणि संबंधित मागण्यांवर पाय खेचत राहिल्यास, सरकारी रुग्णालयातील सर्व वरिष्ठ डॉक्टरांच्या राजीनाम्यासाठी राज्यव्यापी हाक देण्यास भाग पाडले जाईल. आमच्या कनिष्ठ सहकाऱ्यांसोबत एकजुटीचं हे पाऊल असेल. आजचा दिवस संपण्यापूर्वी आम्ही आमच्या संस्थेमध्ये याबद्दल तपशीलवार चर्चा करू."
आमरण उपोषणावर असलेल्या डॉक्टरांच्या मागण्यांमध्ये राज्याच्या आरोग्य सचिवांना हटवणं, वैद्यकीय महाविद्यालय परिसरात नागरी स्वयंसेवकांऐवजी पुरुष व महिला पोलिसांची नियुक्ती करावी, डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरावीत, विद्यार्थी निवडणुका घ्याव्यात आणि त्यांना मान्यता द्यावी. निवासी डॉक्टर्स असोसिएशन, राज्य वैद्यकीय परिषदेच्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी आणि 'धमकी देणाऱ्या टोळ्यां'मध्ये सामील असलेल्यांना शिक्षा करण्यासाठी महाविद्यालय स्तरावरील चौकशी समित्या स्थापन करा या मागण्यांचा समावेश आहे.