कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्रिन्सिपल संदीप घोषला सीबीआय कोर्टाने २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू आहे. विशेष न्यायालयात हजर असताना वकिलांनी त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. आंदोलक वकिलांनी त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.
आंदोलक वकिलांनी घोषणाबाजी करत संदीप घोषला फाशीची शिक्षा द्यावी, असं सांगितलं. तो बलात्कारी, खुनी, चोर आहे. त्याला इथे आणा. त्याचा चेहरा दाखवा. त्याच्या जागी आम्ही असतो तर आम्ही आत्महत्या केली असती. त्याला फक्त सात दिवसांसाठी आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला धडा शिकवू असंही म्हटलं. कोर्ट परिसरात संतप्त जमाव पाहता कडेकोट बंदोबस्तात संदीप घोषला जेलमध्ये नेण्यात आलं.
कोलकाता येथील लालबाजार येथील पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर आठवडाभरानंतर मंगळवारी शेकडो ज्युनियर डॉक्टरांनी आरोग्य भवनाकडे मोर्चा काढला. ट्रेनी डॉक्टरला न्याय, कोलकाता सीपी आणि अनेक आरोग्य अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलक डॉक्टरांनी साल्ट लेकच्या सेक्टर ५ मधील आरोग्य विभागाच्या मुख्यालयाकडे मोर्चा काढला.
आंदोलकांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. राज्य सरकारला आपल्या पाच मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलकांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत दिली. तसेच यामध्ये कोलकाता पोलीस आयुक्त, राज्याचे आरोग्य सचिव, आरोग्य शिक्षण संचालक (DHE) आणि आरोग्य सेवा संचालक (DHS) यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा समावेश आहे.
९ ऑगस्ट रोजी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील सर्व रुग्णालयांमध्ये ज्युनिअर डॉक्टरांनी काम बंद केलं आहे, त्यामुळे आरोग्य सेवा कोलमडली आहे. ज्युनिअर डॉक्टर कामावर नसल्यामुळे २३ रुग्णांना जीव गमवावा लागल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. अनेकांवर उपचार झाले नाहीत.