कोलकाता येथे ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात पश्चिम बंगालमध्ये निदर्शनं सुरू आहेत. आता पीडितेच्या आईने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे, ज्यात त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय नको असल्याचं म्हटलं होतं. पीडितेच्या आईने म्हटलं की, "मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणत आहेत की, कुटुंबाला न्याय नको आहे. ममता यांना स्वतःला मुलगा किंवा मुलगी नाही, त्यामुळे मुलगी गमावल्याचं दुःख त्यांना समजणार नाही. त्यांच्या विधानाने आम्ही दुखावलो आहोत."
द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, डॉक्टरच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या विधानामुळे ते दुखावले गेले आहेत. डॉक्टरच्या आईने सांगितलं की, ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी जे सांगितलं ते मला आवडलं नाही. संपूर्ण जग माझ्या मुलीच्या पाठीशी उभं आहे. न्यायासाठी ते आंदोलन करत आहेत. पण त्या (ममता) म्हणत आहेत की, आम्हाला न्याय नको आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवावं असं आवाहन मी आंदोलकांना करते.
ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. नुकतीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्या रात्री कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरवर अत्याचार झाला, त्या रात्री मुलीच्या कुटुंबाला रुग्णालयातून फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. खरी घटना काय आहे हे कॉलवर सांगण्यात आलं नव्हतं. आरजी कार हॉस्पिटलमधून डॉक्टरच्या घरी कॉल करण्यात आले होते.
"मुलीची तब्येत खराब आहे, लवकर या..."; ट्रेनी डॉक्टरच्या पालकांना हॉस्पिटलमधून आले ३ कॉल
एका व्यक्तीने फोन केला आणि मुलीच्या पालकांना तातडीने रुग्णालयात येण्यास सांगितलं. तुमच्या मुलीची तब्येत बरी नसल्यामुळे प्लीज लवकर या असं सांगितलं नंतर मुलीने कदाचित आत्महत्या केली असेल असं म्हटलं. पहिल्या कॉलवर असिस्टंट सुपरिटेंडेंटने तुमच्या मुलीची तब्येत खराब झाली आहे. तिला एडमिट केलंय लगेचच रुग्णालयात या असं सांगितलं. मुलीच्या वडिलांनी काय झालंय? असं विचारल्यावर, तुम्ही आल्यावर तुम्हाला डॉक्टर हे उत्तर देतील असं सांगितलं.