कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता निर्भया प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं त्याबद्दल डॉक्टरच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आवाहनावर आता मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ममता बॅनर्जींनी लोकांना निदर्शनांपासून लक्ष हटवून दुर्गापूजेवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं आहे. या विधानाबाबत पीडितेच्या वडिलांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "आम्हाला असं वाटतं की, यावर्षी कोणीही दुर्गापूजा साजरी करणार नाही. जर कोणी साजरी केली तर ते आनंदाने साजरे करणार नाहीत, कारण बंगाल आणि देशातील सर्व लोक माझ्या मुलीला आपली मुलगी मानत आहेत."
ट्रेनी डॉक्टरच्या आईने ममता बॅनर्जी यांनी 'दुर्गा पूजे'वर केलेल्या विधानाला असंवेदनशील म्हटलं आहे. त्यांनी इंडिया टुडेला सांगितले की, "आम्ही आमच्या मुलीसोबत दुर्गापूजा साजरी करायचो, पण येत्या काही वर्षांत आम्ही दुर्गापूजा किंवा इतर कोणताही सण कधीच साजरा करणार नाही. त्यांची टिप्पणी असंवेदनशील आहे. जर त्यांच्या कुटुंबात असे घडलं असतं, तर त्यांनी असं म्हटलं असतं का? माझ्या घरचा दिवा कायमचा विझला आहे. त्याने माझ्या मुलीची गळा दाबून हत्या केली. आता ते आम्ही करत असलेल्या न्यायाची मागणी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत."
"पोलिसांनी जबरदस्तीने शूट केला Video"; आई-वडिलांच्या नव्या दाव्याने खळबळ
आरजी कर रुग्णालयातील आंदोलक डॉक्टरांसोबत सहभागी झालेल्या मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी कोलकाता पोलिसांनी मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. महिला डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं की, आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह ठेवायचा होता, पण आमच्यावर खूप दबाव टाकण्यात आला आणि तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला बाजूला घेऊन पैसे देऊ केल्याचा आरोपही पीडितेच्या वडिलांनी केला आहे. त्यांच्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर आणि अंत्यसंस्काराआधी घरी आणण्यात आला. मात्र मुलीच्या वडिलांनी पैसे घेण्यास नकार देत आपलं मत मांडलं. या प्रकरणी टीएमसीने महिला डॉक्टरच्या पालकांच्या वतीने पोलिसांनी दबाव आणल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.