CJI Chandrachud : पश्चिम बंगालच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा बलात्कार करुन हत्या केल्याने देशभरात संताप व्यक्त केला जातोय. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेले आहेत. कोलकात्याच्या या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने संप करणाऱ्या डॉक्टरांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधिश डीवाय चंद्रचूड यांनी डॉक्टरांना भावनिक आवाहन करत रुग्ण तुमची वाट पाहत आहेत त्यामुळे कामावर परत या असं म्हटलं. कामावर परतल्यानंतर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही सरन्यायाधिशांनी दिले.
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली होती. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करत आहे. यादरम्यान, सरन्यायाधीशांनी स्वत:सोबत घडलेला एक प्रसंग सांगितला. मी सुद्धा सरकारी रुग्णालयाच्या जमिनीवर झोपले होते, असे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले.
महिला डॉक्टर हत्येप्रकरणी बंगालचे ममता सरकार आणि सीबीआयने आजच सर्वोच्च न्यायालयात अहवाल दाखल केला आहे. त्याचवेळी, सर्वोच्च न्यायालयाने एम्सच्या निवासी डॉक्टरांच्या अर्जावर सुनावणी करताना सांगितले की, जर डॉक्टर कामावर गेले नाहीत तर त्यांना गैरहजर मानले जाईल. कायदा स्वतःच्या मर्जीनुसार चालेल. त्यावेळी एम्सच्या निवासी डॉक्टरांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाचा निषेध केल्यामुळे त्यांचा छळ केला जात आहे.
"डॉक्टरांनी कामावर परतावे. आम्ही तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. डॉक्टरांनी ड्युटी जॉईन करावी, लोक त्यांची वाट पाहत आहेत. निवासी डॉक्टर तरुण डॉक्टर आहेत. त्यांनी समजून घेऊन कामावर परतावे. या समितीमध्ये दीर्घकाळापासून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. निश्चिंत राहा, समिती तुमचेही ऐकेल. आम्हाला माहित आहे की डॉक्टर दिवसाचे ३६ तास काम करतात. माझ्या कुटुंबातील एक सदस्य आजारी असताना मी स्वत: सरकारी रुग्णालयात जमिनीवर झोपलो होतो," असं सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले.
डॉक्टरच काम करत नसतील तर सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा कशा चालवणार? त्यानंतर काही अडचण असेल तर आमच्याकडे या, मात्र आधी त्यांना कामासाठी परतावे लागेल, असेही खंडपीठाने सांगितले. न्यायालयाने आंदोलक डॉक्टरांना आधी कामावर परतण्यास सांगितले आणि एम्स नागपूरच्या वकिलांना आश्वासन दिले की ते कामावर परतल्यानंतर कोणतीही प्रतिकूल कारवाई केली जाणार नाही.