पश्चिम बंगालमध्ये एका महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. याच दरम्यान, बुधवारी मध्यरात्री, काही लोकांनी आरजी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि जवळपास तासभर मेडिकल उपकरणं, दरवाजे, खिडक्या आणि जे काही मिळेल ते तोडून निघून गेले.
एम्स दिल्लीचे डॉ. सुवर्णकर दत्ता यांनी आरोप केला आहे की, "१००० हून अधिक लोकांच्या जमावाने आरजी कर मेडिकल कॉलेजवर हल्ला केला आणि पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या लोकांनी आपत्कालीन वॉर्ड, हायब्रिड क्रिटिकल केअर युनिट, क्रिटिकल केअर युनिट आणि औषधांचं दुकानात गोंधळ घातला."
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काही हल्लेखोरांनी शॉर्ट्स आणि टी-शर्ट घातले होते ज्यावर 'वी वॉन्ट जस्टिस' लिहिलेलं होतं, ते एक मोर्चा घेऊन आल्यासारखे दिसत होते. त्यांनी सांगितलं की, हल्लेखोरांनी रुग्णालयाच्या परिसरात प्रवेश केला, बॅरिकेड्स तोडले आणि सुमारे अर्धा तास गोंधळ घातला. रुग्णालयात हिंसाचाराच्या आरोपाखाली पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे.
या आरोपांबाबत कोलकाता पोलिसांनी सांगितलं की, "गुन्ह्याचे ठिकाण हे सेमिनार रूम आहे आणि तिथे कोणी गेलेलं नाही. खोट्या बातम्या पसरवू नका. आम्ही अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू." वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलं की, "४० लोकांचा एक गट आंदोलक म्हणून हॉस्पिटलच्या परिसरात घुसला, मालमत्तेचं नुकसान केलं आणि पोलिसांवर दगडफेक केली, त्यानंतर पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला."
आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी राज्य पोलीस आणि तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार निशाणा साधला. हॉस्पिटलमध्ये जमावाने डॉक्टरांना मारहाण केली आणि पोलीस तिथे शांतपणे उभे राहिले, असा आरोप त्यांनी केला आहे.