कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून झालेल्या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. ही महिला डॉक्टर हॉस्पिटलमधील सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट २०२४ रोजी मृतावस्थेत सापडली होती. बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. दरम्यान, या मृत महिला डॉक्टरचा सविस्तर पोस्टमार्टेम रिपोर्ट आता समोर आला आहे. तसेच या रिपोर्टमधून तिच्यासोबत झालेल्या क्रौर्याची सविस्तर माहिती समोर आली आहे. या रिपोर्टनुसार पीडितेच्या शरीरावर १४ हून अधिक जखमेच्या खुणा होत्या. मात्र कुठलाही फ्रॅक्चर झाल्याचं दिसून आलं नाही.
डिटेल पोस्टमार्टेम रिपोर्टमधील नोंदीनुसार मृत तरुणीचे दोन्ही गाल, ओठ, नाक, डावा जबडा, मान, डावा हात, खांदे, ढोपर आणि प्रायव्हेट पार्टवर जखमांच्या खुणा दिसून आल्या. तसेच बाह्य आणि अंतर्गत जननांगाचं वजन १५१ ग्रॅम होतं. शरीराच्या अनेक भागात रक्ताच्या गुठळ्या जमा झालेल्या होत्या. मृत महिला डॉक्टरचे व्हिसेरा, रक्त आणि इतर नमुने अधिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
पीडित महिला डॉक्टरच्या शरीरावर आणि प्रायव्हेट पार्टवर झालेल्या जखमा ह्या तिच्या मृत्यूपूर्वी झालेल्या होत्या, असे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याबरोबरच पोस्टमार्टेम रिपोर्टच्या आधारावर मेडिकल ऑफिसरने सांगितलं की, दोन्ही हातांनी गळा आवळल्याने पीडितेचा मृत्यू झाला होता. तसेच तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फोर्सफूल पेनिट्रेशन झाल्याचेही पुरावे मिळाले आहेत. तसेच पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये या महिला डॉक्टरचं लैंगिक शोषण झाल्याचीही शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या घटनेची दखल घेतली आहे. त्यावर २० ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.