कोलकात्यातील आरजी कार मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर, देशभरात संतापाचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सातत्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यातच, पश्चिम बंगाल भाजप प्रमुख सुकांत मजूमदार यांनी गुरुवारी आरजी कार मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर मोठा आरोप केला आहे.
सुकांत मजुमदार म्हणाले, कोलकाता बलात्कार आणि हत्याकांडाच्या दुसऱ्याच दिवशी संदीप घोष यांनी पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भातील आदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देखील पोस्ट करण्यात आला आहे.
असे केले आरोप? -बंगाल भाजप प्रमुख सुकांत मजुमदार यांनी आरोप केला आहे की, माजी प्राचार्याने बलात्कार प्रकरणाच्या दुसऱ्या दिवशी सेमिनार हॉलजवळ नूतनीकरणाचे आदेश दिले होते. याच ठिकाणी महिला डॉक्टरवर बलात्काराची घटना घडली आणि नंतर तिची हत्या करण्यात आली होती. पीडितेच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर 10 ऑगस्ट रोजी हा आदेश जारी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आंदोलक आरोप करत असतानाही पोलीस आयुक्त सातत्याने ते फेटाळत होते, असेही सुकांत मजुमदार यांनी म्हटले आहे.
पत्रात काय? -सुकांत मजूमदार यांनी X वर जे पत्र शेअर केले आहे, ते माजी प्राचार्य संदीप घोष यांनी पीडब्लूडीच्या इंजिनिअरला लिहिले असल्याचे सांगण्यात येत आहे. यात, "रुग्णालयातील विविध विभागात डॉक्टरांच्या खोल्या आणि स्वतंत्र संलग्न स्वच्छतागृहांची कमतरता आहे. निवासी डॉक्टरांच्या मागणीनुसार तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी," असे म्हणण्यात आले होते.
ममतांवरही निषाणा - सुकांत मजुमदार यांनी हे पत्र शेअर करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला आहे. सुकांत माजुमदार यांनी X वर लिहिले आहे की, "हे पत्र पुष्टी करते की, पुरावे नष्ट करण्यासाठी पीडितेच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी सेमिनार हॉल उद्ध्वस्त करण्यात आला. आरोग्य मंत्री आणि अयशस्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सूचनेशिवाय हे होऊ शकत नाही."