पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यासह देशातील समाजमन ढवळून निघालं आहे. तसेच या घटनेचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवनवे प्रश्न समोर येत आहेत. आता महिला डॉक्टरच्या मृतदेहाजवळ एक डायरी सापडली होती. या डायरीमधील काही पानं फाटलेली होती. त्यामुळे या डायरीच्या फाटलेल्या पानांमध्ये काही गुपित दडलेलं होतं का, असा प्रश्न तपासकर्त्यांसमोर उपस्थित झाला आहे. हे पान जाणीवपूर्वक फाडलं गेलं का? अशीही शंका उपस्थित होत आहे.
कोलकाता पोलिसांनी सीबीआयकडे एक डायरी सुपुर्द केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही डायरी महिला डॉक्टरच्या मृतदेहासमोर सापडली होती. या डायरीची काही पानं फाडलेली होती. तसेच काही पानांचे तुकडे झालेले होते. आता मिळत असलेल्या माहितीनुसार कोलकाता पोलिसांनी डायरीमधील फाटलेली पानं सीबीआय अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली आहेत.
मिळत असलेल्या माहितीनुसार ड्युटीवर उपस्थित असलेल्या प्रत्येक डॉक्टरकडे एक डायरी असते. त्यावर औषधांची नावं आणि इतर गोष्टी लिहिलेल्या असतात. दरम्यान, ही डायरी समोर आल्यानंतर सीबीआयने सतर्क होत अधिक बारकाईने तपासाला सुरुवात केली आहे. यादरम्यान, सीबीआयची टीम आज या प्रकरणी अटक केलेला मुख्य आरोपी संजय रॉय याची सायको अॅनॅलिसीस टेस्ट करणार आहे. यादरम्यान, सीएफएसएलची टीम त्याची तपासणी करून या घटनेबाबतच्या कड्या जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच सीबीआय या डायरीमधील फाटलेल्या पानांबाबतही काही प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणी सीबीआयकडून रुग्णालय प्रशासनाने ही घटना घडल्यानंतर केलेल्या कृतीबाबतही बारकाईने तपास केला जात आहे. त्याबाबत सीबीआयने आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाली असतानाही तिच्या कुटुंबीयांना तिने आत्महत्या केली, अशी चुकीची माहिती का दिली गेली, याचा शोध सीबीआयकडून घेतला जात आहे.