नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातील वाद काही थांबायला तयार नाही. त्यात आता धनखड यांनी पुन्हा बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला आहे. पश्चिम बंगालमधील लोकशाही संपली आहे. औरंगजेबानं शिवरायांसोबत जे केलं, तसंच ममता वागत असल्याचा आरोप धनखड यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी आणि राज्यपाल धनखड यांच्यात सातत्याने खटके उडत आहे. विधानसभा अध्यक्षांनी स्नेहभोजनासाठी राज्यपालांना बोलवून ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्याची घटना असो की, राज्यपाल विधानसभेत जाण्यासाठी आले असता गेट बंद करण्याची घटना असो. मुख्यमंत्री बॅनर्जी आणि राज्यपाल धनखड यांच्यातील वाद नेहमीचा चर्चेचा विषय ठरला आहे.
आता राज्यपाल धनखड यांनी पुन्हा मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. पश्चिम बंगालमधील लोकशाही संपली आहे. कधी वीसी रूम तर कधी विधानसभेचे गेट बंद होतात. मी जेव्हा एखांद्या शहरात भेट देण्यासाठी जातो, त्यावेळी तिथे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहत नाही. त्यामुळे लोकशाही संपवण्याचा प्रयत्न तर केले जात नाही ना ? असा प्रश्न राज्यपाल धनखड यांनी उपस्थित केला.
औरंगजेबानं शिवाजी महाराजांसोबत जे केले, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ममता वागताहेत. मी ममता यांना औरंगजेब म्हणत नाही. मात्र पश्चिम बंगालच्या आयरन लेडी ह्या औरंगजेबाप्रमाणे काम करत असल्याची टीका राज्यपाल धनखड यांनी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री बॅनर्जी आणि राज्यपाल धनखड यांच्यामधील वाद अधिकच वाढताना पाहायला मिळत आहे.