कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मंत्रोच्चारण करण्याचे आव्हान दिले आहे.
नजरुल मंचमध्ये इंटरनॅशनल मारवाडी फेडरेशनद्वारे आयोजित होळीच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली. ममत बॅनर्जी म्हणाल्या,' ते (भाजपा) आमच्यावर आरोप करतात की आम्ही बंगालमध्ये दुर्गा पूजा करु देत नाही. दिल्लीतून येऊन आम्हाला कोणी धर्म शिकवू शकत नाही.' खरंतर, आम्ही धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवत नाही. आमचा मानवतेवर विश्वास आहे.'
भाजपा निवडणुकांच्या आधीपासून फक्त राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करत आली आहे. आम्ही तारापीठ तारकेश्वर, दक्षिणोश्वर मंदिरांचे नुतनीकरण आणि पुनर्विकास केले आहे. फक्त चंदनाचा टिळा लावल्याने कोणी पुजारी होत नाही. मंत्रोच्चारणात सुद्धा स्पर्धा झाली पाहिजे. मग, पाहू कोणाला किती संस्कृत माहिती आहे, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.