कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याच्याबाबत एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. डॉक्टरचा मृतदेह ९ ऑगस्ट रोजी सापडल्याच्या एका दिवसानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेलं आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, ८ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर संजय रॉय एका मित्रासोबत सोनागाछीला गेला होता. हा उत्तर कोलकात्याचा 'रेड लाईट एरिया' आहे. त्याने सांगितलं की, आरोपी रॉय त्या रात्री दारू प्यायला होता. सोनागाछीला पोहोचल्यावर रॉयचा साथीदार एका घरात घुसला, तर संजय बाहेर उभा होता.
रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने असंही म्हटलं आहे की, सोनागाछीनंतर ते दोघेही रात्री दोनच्या सुमारास दक्षिण कोलकातामधील चेतला या आणखी एका रेड लाइट एरियामध्ये गेले आणि येथेही तीच घटना घडली. आरोपीने मद्यधुंद अवस्थेत तेथून जाणाऱ्या एका महिलेची छेड काढली. त्याने एका महिलेला फोन करून तिचे न्यूड फोटो मागितले.
संजय रॉयचा मित्र बाईक घेऊन घरी गेला. याच दरम्यान, संजय पहाटे ३.५० च्या सुमारास आरजी कर हॉस्पिटलच्या ट्रॉमा युनिटमध्ये फिरताना दिसला. दरवाजा तोडून संजय मद्यधुंद अवस्थेत ऑपरेशन थिएटरमध्ये घुसला. पहाटे ४.०३ च्या सुमारास तो हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये पोहोचला आणि त्यानंतर थेट तिसऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये गेला.
पोलीस चौकशीत संजयने कबुली दिली की, ट्रेनी डॉक्टर गाढ झोपेत असताना त्याने तिला पाहिलं आणि तेव्हाच बलात्कार केला. त्या रात्री रॉय अनेक वेळा हॉस्पिटलच्या परिसरात शिरल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. याच दरम्यान, सीबीआयला सोमवारी कोलकाता न्यायालयाकडून संजय रॉयची पॉलीग्राफ ट्रेस्ट करण्यास परवानगी मिळाली आहे.