कोलकाता येथे ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. भाजपा आणि इतर पक्ष पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. डॉक्टर आणि वकीलही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
देशभरात गोंधळाचं वातावरण असतानाच तृणमूल काँग्रेसचे खासदार अरुप चक्रवर्ती यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खासदार अरुप चक्रवर्ती यांनी आंदोलन आणि संप करणाऱ्या डॉक्टरांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच चक्रवर्ती यांच्या विधानावरून संपावर असलेल्या डॉक्टरांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले तृणमूल काँग्रेसचे खासदार?
पश्चिम बंगालच्या बांगुरा येथे एका रॅलीत अरुप चक्रवर्ती म्हणाले की, "आंदोलनाच्या नावाखाली तुम्ही लोक घरी जाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसह फिरायला जाऊ शकता. जर तुमच्या संपामुळे हॉस्पिटलमध्ये एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला आणि लोक तुमच्यावर संतापले तर आम्ही तुम्हाला वाचवणार नाही."
रॅलीनंतर पत्रकारांनी त्यांना वादग्रस्त विधानाबाबत प्रश्न विचारल्यावरही ते आपल्या विधानावर पूर्णपणे ठाम राहिले. माध्यमांशी बोलताना त्यांनी पुनरुच्चार केला की, "डॉक्टर संपावर आहेत. संपाच्या नावाखाली लोकांना उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो. अशा स्थितीत संप करणाऱ्या डॉक्टरांचा लोकांना राग येईल आणि अशा परिस्थितीत आपण त्यांना वाचवू शकणार नाही, हे स्वाभाविक आहे."
१४ ऑगस्ट रोजी काही गुंडांनी आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये घुसून संपावर असलेल्या डॉक्टरांवर हल्ला केला होता. रिपोर्टनुसार पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या आपत्कालीन इमारतीच्या तळमजल्यावरही तोडफोड करण्यात आली.