नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3,09,46,074 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,792 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 624 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,11,408 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. कोरोनाने अनेकांच्या जवळची माणसं हिरावून नेली आहे. तर काहींच्या डोक्यावर आई-वडिलांचं छत्रच हरवलं आहे. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. कोरोनामुळे एका नवजात बाळाने आपल्या आईला गमावलं आहे. यानंतर 21 दिवस मृत्यूशी लढत बाळाने जगण्याचं युद्ध जिंकल्याची घटना समोर आली आहे.
कोलकातामध्ये ही घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली होती. याच दरम्यान महिलेची प्रकृती अधिकच गंभीर झाली. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. आईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका असल्याने डॉक्टरांनी सी-सेक्शनच्या माध्यमातून महिलेची डिलिव्हरी केली. बाळाचा जन्म झाल्यानंतर काही तासांनीच आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बाळाची प्रकृती देखील गंभीर होती. 21 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर आता बाळ पुर्णपणे बरं झाल्याची माहिती मिळत आहे. आता बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय राखी मंडल विश्वास यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना गर्भवती असताना कोरोनाची लागण झाली होती. मात्र याच दरम्यान त्यांची प्रकृती आणखी बिघडली. डिलिव्हरी नंतर राखी यांचा मृत्यू झाला. बाळाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्याची विशेष काळजी घेण्यात आली. डॉक्टरांनी बाळाला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवलं आणि काही दिवसांनी हळूहळू बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कोरोनाची तिसरी लाट लवकर येणार?; 'या' 8 राज्यांतील पॉझिटिव्हिटी रेटने वाढवलं टेन्शन, धोक्याचा इशारा
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना लोकांचा निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो. आठ राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार. तपासणीमध्ये जर पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तेथील संक्रमण हे नियंत्रणाबाहेर आहे. तर केरळचा प़ॉझिटिव्हिटी रेट हा 10.5 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील तब्बल 73 जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा 10 टक्के झाला आहे. ज्यातील 45 जिल्हे हे पूर्वोत्तर राज्यातील आहेत. यामुळेच तज्ज्ञांची विशेष टीम या राज्यांत पाठवण्यात आली आहे. सिक्किम - 19.5%, मणिपूर - 15%, मिझोरम - 11.8%, केरळ - 10.5%, मेघालय - 9.4, अरुणाचल प्रदेश - 7.4%, नागालँड - 6%, त्रिपुरा - 5.6% या राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने चिंता वाढवली आहे.