Kolkata doctor rape-murder: कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार-हत्येच्या घटनेवरुन देशभरात संतापची लाट आहे. एकीकडे सामान्य लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत, दुसरीकडे डॉक्टरही संपावर गेले आहेत. सरकारने संपूर्ण सुरक्षा पुरवावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. दरम्यान, आता मृत डॉक्टरच्या आईने धक्कादायक खुलासा केला आहे.
त्या घटनेत हत्या झालेल्या महिला डॉक्टरच्या आईने त्या दिवशीची संपूर्ण घटना सांगितली. 'आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला आणि तुम्ही मुलगी आजारी आहे, लवकर हॉस्पिटलमध्ये या, असे सांगितले. थोड्यावेळाने पुन्हा फोन केला असता तुमच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. ते ऐकून काय बोलावे, काय करावे, राहीच सूचत नव्हते.'
'ही हत्या आहे, आत्महत्या नाही''आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, तर आम्हाला सुरुवातीला मुलीला पाहू दिले नाही. काही वेळानंतर आम्हाला मुलीला पाहण्याची परवानगी देण्यात आली. तिची अवस्था पाहून पायाखालची जमीन सरकली. तिच्या अंगावर फक्त एकच कपडा होता. तिचा, पाय तुटलेला होता अन् डोळ्यातून आणि तोंडातून रक्त येत होते. ते द्दष्य पाहून आत्महत्या नसून, हत्या असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.'
सरकारने काहीच केले नाही'मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक केली जाईल, असे सांगितले होते, परंतु अद्याप काहीही झाले नाही. केवळ एकाला अटक करण्यात आली आहे. मला खात्री आहे की या घटनेत आणखी बरेच लोक सामील आहेत. या घटनेला संपूर्ण विभाग जबाबदार आहे. पोलिसांनी अजिबात चांगले काम केले नाही. मुख्यमंत्री आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांनी आंदोलन करू नये म्हणून त्यांनी आज येथे कलम 144 लागू केले. पोलिसांनी आम्हाला अजिबात सहकार्य केले नाही, त्यांनी शक्य तितक्या लवकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला,' असा आरोपही पीडितेच्या आईने केला आहे.