कोलकाता - कोलकातामधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याप्रकरणात नवा द्विस्ट येण्याची शक्यता आहे. मी सेमिनारच्या खोलीत चुकून गेलो. तेथे डॉक्टरचा मृतदेह आधीच खाली पडलेला होता. तिला हलवून पाहिले. मात्र, काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे मी घाबरून पळालो आणि कशाचा तरी धक्का लागून धडपडलो. त्यावेळी ब्लूटूथयंत्र खाली पडले, असा दावा याप्रकरणातील प्रमुख आरोपी संजय रॉय याने केला आहे. त्याची पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांमधून ही माहिती त्याने दिली आहे.
संजय रॉय याने सांगितले की, ८ ऑगस्टच्या रात्री एका रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्याला ऑक्सिजनची गरज होती. त्यासाठी डॉक्टरला शोधत होतो. त्यावेळी तिसऱ्या मजल्यावरील सेमिनारच्या खोलीत गेलो. तेथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह पडलेला होता. मी त्या डॉक्टरला आधीपासून ओळखत नव्हतो, असेही रॉय याने सांगितले. महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचा तपास सीबीआय करीत आहे. याप्रकरणी आतापर्यंत १० जणांची पॉलिग्राफ चाचणी झालेली आहे.
'भाजी-चपाती नको, मला चाऊमिन द्या'■ संजय रॉय हा सध्या तुरुंगात आहे. तेथे तो जेवणावरून नखरे करीत असल्याची माहिती आहे. त्याला तुरुंगात मिळणारी भाजी- चपाती नकोय. रोज तो नवी मागणी करत आहे.■ त्याला साध्या खाण्याचा कंटाळा आला असून चमचमीत चायनीज अन्न त्याला हवे आहे. मात्र, तुरुंग प्रशासनाने त्याला फटकारले असून असले काहीही मिळणार नसल्याचे स्पष्ट केले.