Kapil Sibal : कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा बलात्कार करुन हत्या केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, पश्चिम बंगाल सरकारचे वकील कपिल सिब्बल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यात जोरदार वादावादी झाली. कपिल सिब्बल हे कोलकाता प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारचे प्रतिनिधित्व करत आहेत, तर सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता न्यायालयात हजर होते. या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल एका गोष्टीवर हसायला लागले, त्यामुळे तुषार मेहता चांगलेच संतापले आणि त्यांना कोर्टातच खडसावले.
सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. गुरुवारी सीबीआय आणि कोलकाता पोलिसांनी सीलबंद लिफाफ्यात त्यांचा स्टेटस रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला सादर केला. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पश्चिम बंगाल सरकारचे प्रतिनिधित्व करत असलेल्या कपिल सिब्बल यांना झापले.
झालं असं की तुषार मेहता कोलकाता प्रकरणातील डीडी एंट्रीबाबत आपले मत मांडत होते, तेव्हा सिब्बल यांनी त्यांच्या प्रश्नाला हसून उत्तर दिले. सुनावणी सुरु असतानाच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कपिल सिब्बल यांच्या हसण्यावर आक्षेप घेतला. "कोणीतरी (कोलकाता येथील महिला डॉक्टर) मरण पावली आहे. त्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. तुम्ही हसू कसे शकता? निदान हसू तरी नका, हा कुणाच्या तरी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे," अशा शब्दात तुषार मेहता यांनी सिब्बल यांना सुनावले.
त्यानंतर सॉलिसिटर तुषार मेहता म्हणाले की, 'आमच्याकडे पश्चिम बंगालच्या विद्यमान मंत्र्याचे विधान आहे, ते म्हणतात की आमच्या नेत्याविरोधात काही बोलले तर बोटे छाटली जातील.' त्यावर सिब्बल म्हणाले की, 'तुमचे नेते म्हणतात की गोळी घालू!' यावेळी सरन्यायाधिशांनी दोन्ही वकिलांना शांत केले आणि म्हणाले, 'याचे राजकारण करू नका, आम्हाला डॉक्टरांच्या कल्याणाची आणि सुरक्षिततेची देखील काळजी आहे.
यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खुलासा केला की सीबीआयसाठी तपास सुरू करणे हे एक आव्हान आहे आणि गुन्ह्याच्या पुराव्यांसोबत छेडछाड करण्यात आली आहे. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, पश्चिम बंगाल पोलिसांनी आधी पीडितेच्या पालकांना सांगितले की हे आत्महत्येचे प्रकरण आहे आणि नंतर त्यांना सांगितले की ही हत्या आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृताच्या अंतिम संस्कारानंतर १२.४५ वाजता एफआयआर नोंदवण्यात आला.