कोलकाता: कोलकात्याच्या प्रेसिडिन्सी तुरुंगात एक अजब प्रकार घडला आहे. मोबाईलसोबत पकडला गेल्यानं कैद्यानं चक्क मोबाईल गिळल्याची घटना प्रेसिडिन्सी तुरुंगात घडली आहे. या घटनेमुळे तुरुंग प्रशासनाकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र परवानगी नसतानाही कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचत असल्यानं तुरुंग प्रशासन अडचणीत आलं आहे.तुरुंगातील एका कैद्याकडे मोबाईल असल्याची माहिती एका अधिकाऱ्याला मिळाली. त्यामुळे तुरुंगातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. यावेळी रामचंद्र एका कोपऱ्यात मोबाईलवरुन बोलत होता. अधिकाऱ्यांनी आपल्याला पाहिल्याचं लक्षात येताच तो पळू लागला. यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. काही वेळ ही पळापळ सुरू होती. मात्र आपण पकडले जाणार हे रामचंद्रच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्यानं चक्क मोबाईल गिळून टाकला. रामचंद्र वर्षभरापासून प्रेसिडिन्सी तुरुंगात आहे. त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.मोबाईल गिळल्यानंतर थोड्याच वेळात रामचंद्रच्या पोटात वेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्याला एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रामचंद्रच्या पोटाचा एक्स-रे काढण्यात आला असून त्यामध्ये मोबाईल आढळून आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. 'आधी त्याच्यावर एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याठिकाणी त्याच्या पोटात तीन इंचाचा मोबाईल आढळून आला. यानंतर त्याला एम. आर. बांगूर रुग्णालयात हलवण्यात आलं. नैसर्गिक क्रियेच्या माध्यमातून मोबाईल बाहेर येईल, अशी आम्हाला आशा आहे. अन्यथा शस्त्रक्रिया करावी लागेल,' अशी माहिती रुग्णालयातील एका अधिकाऱ्यानं दिली. कैद्यांना तुरुंगात मोबाईल नेण्यास परवानगी नाही. मात्र तरीही अनेकदा देशातील तुरुंगाकडे मोबाईल आढळून आले आहेत.