नवी दिल्ली : विदेश मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गेले दोन आठवडे संसदेच्या कामकाजाचा खोळंबा झाला असताना सोमवारी काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणा लिहिलेले फलक दाखवत जोरदार नारेबाजी केल्यानंतर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या २५ सदस्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याची घोषणा केली. त्यातून संसदेच्या कोंडीत भरच पडली आणि विरोधकांमध्ये एकजुटीचे वारे वाहू लागल्याने सत्ताधारी भाजपाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. तशातच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या घणाघाती टीकेने काँग्रेसला जणू नवी ऊर्जा मिळाली. सोमवारी लोकसभेप्रमाणे राज्यसभाही गोंधळातच तहकूब झाली.‘लोकशाहीतील काळा दिवस’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी २५ पक्ष खासदारांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर दिली असतानाच तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांनी काँग्रेसला जोरदार समर्थन देत पाच दिवस कामकाजावर बहिष्कार घालणार असल्याची घोषणा केली. सर्वपक्षीय बैठकीत सर्व सदस्यांना किमान दोन पथ्ये पाळण्याच्या सूचना केल्या होत्या. सभागृहात फलक दाखवू नये आणि अध्यक्षांच्या आसनासमोर येऊ नये़ या दोन सूचनांचे पालन सदस्यांनी केले नाही, असे सांगत सुमित्रा महाजन यांनी निलंबनाची कारवाई केली. एकाचवेळी काँग्रेसच्या २५ खासदारांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळणे ही बहुदा अधिवेशनाच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे.काल-परवापर्यंतचे दोन्ही सभागृहांमधील गोंधळी आज अचानक चर्चा आणि संवादाचे खंदे पुरस्कर्ते बनले आहेत.
कोंडी फुटेना!
By admin | Published: August 04, 2015 1:55 AM