नवी दिल्ली : ट्विटरला अस्सल भारतीय पर्याय म्हणून ‘कू’ या मायक्रोब्लॉगिंग ॲपला प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा पातळीवर प्रयत्न होत असतानाच या ॲपसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. आतापर्यंत ३० लाख भारतीयांनी ‘कू’ ॲप डाऊनलोड केले आहे. मात्र, या ॲपवरून युजर्स डेटाची गळती होत असून, या ॲपच्या निर्मितीत चिनी गुंतवणूक असल्याचेही उघड होऊ लागले आहे. मात्र, ‘कू’च्या निर्मात्यांनी या सर्व शंका फेटाळून लावल्या आहेत.ट्विटरवर इलियॉट अँडरसन या नावाने प्रसिद्ध असलेल्या रॉबर्ट बाप्टिस्ट या फ्रेंच सायबर सुरक्षा तज्ज्ञाने ‘कू’मधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत. ‘कू’ ॲप डाऊनलोड करणाऱ्या युजर्सचे नाव, त्याचा ई-मेल आयडी, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती आणि लिंग यासारख्या वैयक्तिक माहितीची गळती होत असल्याचे बाप्टिस्ट यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत ३० लाख लोकांनी हे ॲप डाऊनलोड केल्याने त्यांचा वैयक्तिक तपशील इतरांच्या हाती लागलेला असावा तसेच मोठमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांनीही ‘कू’च्या वापराला सुरुवात केल्याने त्यांच्याही वैयक्तिक माहितीची चोरी झाली असावी, असा अंदाज बाप्टिस्ट यांनी व्यक्त केला आहे. ‘कू’च्या चिनी संबंधांविषयीही बाप्टिस्ट यांनी भाष्य केले आहे. ॲपच्या डोमेननावाचा भूतकाळातील तपशील त्यासाठी त्यांनी सादर केला आहे. परंतु त्यात फारसे तथ्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.‘कू’चे स्पष्टीकरण‘कू’च्या निर्मात्यांनी वरील सर्व शंका फेटाळून लावल्या आहेत. ॲपवर युजर्स जेव्हा त्यांचा प्रोफाईल डेटा ॲपवर अपलोड करतात तीच माहिती ‘कू’वर सर्वत्र दिसते. तसेच युजर्सचा वैयक्तिक तपशील गहाळ होत असल्याची शंकाही हास्यास्पद असून पब्लिक प्रोफाईल पेजवर ती माहिती सर्वांनाच दिसते, असे ‘कू’कर्त्यांनी स्पष्ट केले आहे.चिनी गुंतवणुकीविषयी बोलताना ‘कू’ने तेही आरोप फेटाळले आहेत. ‘कू’ची नोंदणी भारतात झाली असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. ‘कू’ची पितृक कंपनी असलेल्या बॉम्बिनेट टेक्नॉलॉजीज या कंपनीत मोहनदास पै यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांच्या ३वन४ या कंपनीद्वारे पै यांनी ही गुंतवणूक केली असल्याचे ‘कू’तर्फे स्पष्ट करण्यात आले. आमच्या व्होकल या अन्य स्टार्ट-अपमध्ये शुनवेई या चिनी कंपनीने गुंतवणूक केली होती. परंतु ती आता पूर्णपणे बाहेर पडत असल्याचेही कंपनीने निवेदनात नमूद केले आहे.
‘कू’वर प्रश्नचिन्ह; युजर्स डेटाची गळती, चिनी संबंधांवरही बोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 6:56 AM