नवी दिल्ली - भीमा-कोरेगाव दंगलीत आरोप असलेल्या पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोन विरुद्ध एक अशा फरकाने निकाल देऊन हस्तक्षेप करण्यास नकार दिला असला, तरी न्या. धनंजय चंद्रचूड यांनी पोलिसांच्या कारवाईविषयी शंका व्यक्त केली आहे.सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर यांनी पोलीस कारवाई योग्य असल्याचे मत नोंदवले आहे. मात्र, न्या. चंद्रचूड यांनी स्वतंत्र निकालपत्र लिहून अटक करण्यात आलेल्या या कार्यकर्त्यांचे नक्षली संबंध असल्याचे आढळून आलेले नाही, त्यामुळे केवळ अंदाजाच्या आधारे त्यांच्या स्वातंत्र्याचे हनन करता कामा नये, असे म्हटले आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांचे वर्तन योग्य नव्हते, सुनावणीच्या दरम्यान पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीमुळे मीडिया ट्रायलचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे पोलिसांच्या कारवाईविषयी शंका निर्माण होते, असेही न्या. चंद्रचूड यांनी नमूद केले. वरवरा राव, सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्सालविस, गौतम नवलखा आणि अरुण परेरा या पाच कार्यकर्त्यांना गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी अटक केली होती.न्या. चंद्रचूड यांनी पोलिसांच्या चौकशीविषयी शंका उपस्थित केली असली तरी अन्य दोघा न्यायाधीशांनी कोणत्या तपास यंत्रणेमार्फत आणि कशा प्रकारे चौकशी व्हावी, हे आरोपी ठरवू शकत नाही, असे निकालपत्रात स्पष्ट केले आहे. याच आधारे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, ही याचिकाकर्त्यांनी केलेली मागणी फेटाळून लावली.
कोरेगाव-भीमा प्रकरण : न्या. चंद्रचूड यांनी पोलीस कारवाईविषयी व्यक्त केली शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 6:57 AM