नवी दिल्ली - भीमा-कोरेगाव प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत आले असून अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याप्रकरणी अर्धवट दोषारोपत्र दाखल झाले असेल तर मला जामीन मिळण्याचा अधिकार असल्याचे एल्गार व कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी अॅड. सुरेद्र गडलिंग यांनी न्यायालयात सांगितले होते. मात्र, सुरेंद्र गडलिंग आणि इतर आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे आहेत. त्यामुळे तांत्रिक बाबींचे कारण देतही त्यांना जामीन देऊ नये, अशी विनंती राज्य सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणी नागपुरातील प्रसिद्ध वकील अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. गडलिंग यांच्यासोबत सुधीर ढवळे व शोमा सेन यांनाही अटक करण्यात आली होती. एल्गार परिषदेत प्रक्षोभग भाषणे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना पुणे पोलिसांनी यापूर्वी त्यांच्या घरावर छापे मारले आहेत. त्यात गडलिंग यांच्या घराचीही झडती घेण्यात येऊन काही दस्तावेज, पेनड्राईव्ह, सीडी, डिव्हीडी व हार्ड डिस्क जप्त करण्यात आले होते. जरिपटका येथील त्यांच्या निवासस्थानावरून त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी जानेवारी 2019 पर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
न्यायालयाकडून अॅड. गडलिंग, रोना विल्सन, शोमा सेन, महेश राऊत आणि सुधीर ढवळे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.