Koregaon-Bhima Violence : नव्या भारतात स्वागत, नक्षल समर्थकांच्या अटकेवरून राहुल गांधींचे सरकारवर टीकास्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 12:49 PM2018-08-29T12:49:19+5:302018-08-29T13:51:20+5:30
Koregaon-Bhima Violence : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएस आणि भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
नवी दिल्ली - पुणे पोलिसांनी मंगळवारी कोरेगाव-भीमा हिंसाचारासंबंधी देशातील वेगवेगळ्या शहरात छापेमारी केली. या कारवाईदरम्यान बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
''देशात केवळ एकाच स्वयंसेवी संस्थेसाठी स्थान आहे आणि ती संस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय. अन्य सर्व स्वयंसेवी संस्था बंद करण्यात याव्यात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कारागृहात डांबावं आणि तक्रारी करणाऱ्यांना गोळ्या झाडाव्यात. नवीन भारतात आपलं स्वागत आहे'', असे ट्विट करत राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर कोरेगाव-भीमा हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचारात एकाचा मृत्यूदेखील झाला होता. या हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं छापेमारी करत हैदराबाद, मुंबई, ठाणे, नवी दिल्ली, रांची येथे छापे घातले. कवी वारा वारा राव (हैदराबाद), इकॉनॉमकि अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (नवी दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई), अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली आहे.
There is only place for one NGO in India and it's called the RSS. Shut down all other NGOs. Jail all activists and shoot those that complain.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 28, 2018
Welcome to the new India. #BhimaKoregaon
दुसरीकडे, 2018 वर्षांच्या सुरुवातीस पुणे पोलिसांनी कथित स्वरुपात माओवादी नेत्याकडून लिहिण्यात आलेले पत्र जप्त केले होते. या पत्रामध्ये देशात वेगवेगळ्या ठिकाणी घडवून आणण्यात आलेल्या नक्षलवादीकारवायांसाठी कवी वारा वारा राव यांनी कथित स्वरुपात केलेल्या मार्गदर्शनाप्रती त्यांचे कौतुक करण्यात आले होते. कॉम्रेड मिलिंद यांनी लिहिलेल्या पत्रात राव यांचे कौतुक करत ‘वरिष्ठ कॉम्रेड’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
या पत्रात असे म्हटले गेले आहे की, 'गेल्या काही महिन्यांमधील विविध उपक्रमांमध्ये वरिष्ठ कॉम्रेड वारा वारा राव आणि आपले कायदेशीर सल्लागार कॉम्रेड वकील सुरेंद्र गाडलिंग यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आपला राष्ट्रीय स्तरावर चांगला प्रचार झाला आहे'
पत्रात नेमके आहे तरी काय?
जून 2018 मध्ये माओवाद्यांशीसंबंधीत असलेले एक पत्र समोर आले होते. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजीव गांधी यांच्याप्रमाणे हत्या करण्याच्या कटाची माहिती उघड झाली होती. 18 एप्रिलला कॉम्रेड प्रकाश यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले गेले आहे की, ''हिंदू फॅसिझमला हरवणं आता आवश्यक झाले आहे. मोदींच्या नेतृत्वात हिंदू फॅसिस्ट पुढे जात आहेत, त्यांना वेळीच थांबवणं गरजेचं आहे. मोदींच्या नेतृत्वात भाजपाची 15 राज्यांमध्ये सत्ता आहे. हे अशाच पद्धतीनं सुरू राहिले तर धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे राजीव गांधी हत्याकांडप्रमाणे घटना घडवावी, असा विचार सुरू आहे. जर असे झाल्यास, हा एक सुसाईड अटॅक वाटू शकतो. आपल्याकडे ही एक संधी आहे, असे आम्हाला वाटते. मोदींच्या रोड शोला टार्गेट करणं एक चांगले नियोजन होऊ शकते''.