कोटा - राजस्थानमधील कोटा येथील जेके. लोन रुग्णालयात सातत्याने बालमृत्यूचे प्रकार घडत आहेत. गेल्या काही दिवसांत आणखी काही चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबरपासून रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 107 पर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने मागील काही दिवसांमध्ये रुग्णालयाची तपासणी केली असता त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
रुग्णालयाच्या खिडकीला असलेल्या काचा फूटल्या होत्या. दरवाजे तूटले होते. तसेच रुग्णालय परिसरात डुक्कर फिरत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू असल्याची भयंकर बाब समोर आली आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी (4 जानेवारी) रुग्णालयात मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.
केंद्राची एक टीम या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 29 डिसेंबर रोजी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या प्रमुख प्रियंका कानूनगो यांनी आपल्या टीमसह रुग्णालयाचा दौरा केला. त्यावेळी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी देखील उपलब्ध नसल्याचे तसेच रुग्णालय अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. तसेच रुग्णालयातील 15 पैकी 9 व्हेंटिलेटर सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
राजस्थानमधील बालमृत्यूवरून आता राजकारणालाही तोंड फुटले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी राजस्थान सरकार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. 'एका महिन्यात 100 मुलांचा मृत्यू होणे ही प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष करण्याइतपत सामान्य बाब नाही, असा संताप भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला होता. तर बीएसपी प्रमुख मायावती यांनीही बालमृत्यूवरून गहलोत सरकार आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली होती. मुलांचा मृत्यूनंतर भाजपाने गहलोत सरकारविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.