कोटा - जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या घटनेनंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी देशभरातून अनेक हात पुढे येत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करत आहेत. राजस्थानच्या कोटाचे रहिवासी असलेले मुर्तजा ए. हामिद यांनी देखील मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी हामिद यांनी त्यांच्या करपात्र उत्पन्नातून 110 कोटी रुपये दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मुर्तजा हे सध्या मुंबईत राहतात. शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमध्ये हे दान जमा करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच हामिद यांनी यासाठी पंतप्रधान कार्यालयाला एक ई-मेल पाठवला आहे. त्यामध्ये त्यांनी दान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. जन्मापासून हामिद दृष्टीहीन असून त्यांनी कोटा येथील एका महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते मुंबईत संशोधक आणि शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत.
हामिद यांनी फ्यूल बर्न रेडिएशन टेक्नॉलॉजीचा शोध लावला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एखादं वाहन किंवा वस्तू ही कॅमेरा किंवा जीपीएसशिवाय शोधता येऊ शकते असा दावा त्यांनी केला. 2016 मध्ये सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास कोणत्याही प्रस्तावाशिवाय सादर करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. परंतू दोन वर्षांनी ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांना मंजुरी मिळाली. पण त्यावरील पुढील प्रक्रियेची वाट अद्याप वाट पाहत असल्याचं हामिद यांनी सांगितलं. हामिद यांनी लावलेल्या शोधाला योग्य वेळी मान्यता मिळाली असती तर पुलवामासारख्या भयंकर हल्ल्याचा तपास करण्यास मदत झाली असती असं ही त्यांनी सांगितलं. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सोन्याच्या बांगड्या विकून मुख्याध्यापिकेने केली शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतउत्तर प्रदेशमधील बरेली येथील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापिकेनंही याआधी आपल्या सोन्याच्या बांगड्या विकून शहिदांच्या कुटुंबीयांना मदत केली आहे. किरण कोटनाला असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचा हातभार लावण्यासाठी त्यांनी 1,38,387 रुपये पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा केले आहेत. किरण कोटनाला यांनी सांगितले की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर शहिदांचे पार्थिव जेव्हा त्यांच्या नातेवाईकांकडे पोहोचले. त्यावेळेस शहीद जवानांच्या पत्नींना रडताना पाहून खूप दुःख झाले. त्यांच्या भावना, अवस्था पाहून आपण या महिलांना कोणत्या पद्धतीनं मदत करू शकतो?, या प्रश्नानं पछाडलं. अखेर त्यांनी आपल्याकडील सोने विकून शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय घेतला. सोन्याच्या बांगड्या विकून त्यातून मिळालेली रक्कम पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा केली.