ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा पांढरा करणारे आणि करून देणाऱ्यांच्या एकाहून एक सुरस कहाण्या समोर येत आहेत. कोटक महिंद्राच्या एका बँक मॅनेजरने काळ्याचे पांढरे करण्यासाठी तब्बल 51 कोटींची लाच स्वीकारल्याचे उघडकीस आले आहे.
कोटक महिंद्रा बँकेच्या दिल्लीतील एका शाखेतील मॅनेजर असलेल्या अशिष कुमार याला आज सकाळीच अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्याने आपल्याकडून काळ्याचे पांढरे करून देण्यासाठी 51 कोटींची लाच स्वीकारल्याचा खुलासा बोहिशोबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेला वकील रोहित टंडन याने सक्तवसुली संचलनालयाच्या (इडी) चौकशीत केला आहे. इडीच्या सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार आशिष कुमार याने 38 कोटी रुपयांचे खोटे ड्राफ्ट बनवले होते. हे ड्राफ्ट नंतर प्राप्तिकर विभागाने रद्द केले. तर 13 कोटी रुपये त्याला कन्व्हर्जन मनीच्या रुपात मिळाले होते.
तसेच आशिष कुमार हा काळ्या पैशाचे पांढऱ्या पैशात रुपांतर करण्यासाठी 35 टक्के कमिशन घेत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. आता आशिष कुमारने अशाप्रकारे कुणाकुणाला काळ्याचे पांढरे करून दिले आहेत, याचा तपास इडी करत आहे.